जिल्हा परिषद : दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळ वाढली, आकांक्षापूर्तीसाठी करावी लागणार पराकाष्टा अमरावती : जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांची इनिंग सुरू झाली आहे. तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळही वाढली. एकाचा अपवाद वगळता इतर सर्व पदाधिकारी नवीन आहेत. बोटावर मोजण्याइतकेच अनुभवी असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी संयुक्त सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे गेले. सभापतीपदांसाठी प्रत्येकाच्या वाटणीला एक पद आले. नवीन पदाधिकारी नवखे आहेत यामुळे जिल्हा परिषदेचा गाडा हाकलताना नवोदितांची कसोटी लागणार आहे. प्रशासनावर वचक ठेवत त्यांना जिल्ह्यातील जनतेच्या आकांक्षांची स्वप्नपूर्ती करावी लागणार आहे. त्यात राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपातील विरोधकांनाही तोंड द्यावे लागणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती नवखे असले तरी त्यांच्या पाठीमागे मातब्बर नेते आहेत तथापी तीन पक्षांची मोट बांधून सत्ता स्थापन झाल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे नेमके नेते कोण असा प्रश्न चर्चिला जात आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची मांदियाळी आहे. भाजपामध्ये नव्याने अनेक नेते तयार झाले. राष्ट्रवादीतही पूर्वीसारखे एक खांबी नेतृत्व उरले नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या दिवशी व पदग्रहणापर्यंत या तिन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची जिल्हा परिषदेत गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)अंतिम शब्द कोणत्या पक्षाचा ?काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात मातब्बर नेते आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम राहणार आहे. जिल्हा परिषदेवर तीन पक्षांची आघाडी आहे. सध्या तीन तिघाडा काम बिघाडा, अशी स्थिती आहे. राज्य व देशात एकमेकांविरुद्ध असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेचा गाडा हाकलताना नव्या आणि नवख्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कसोटी लागण्याचे संकेत आहेत. विरोधकांचा राहणार वचकनवीन पदाधिकारी व प्रशासनावर आक्रमक विरोधकांचा वचक राहणार आहे. राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्ष विरोधात असल्याने सत्तेसाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या पदाधिकारी, सदस्यांना त्यांचा विरोध मोडून काढणे कठीण जाणार आहे. सत्ताधारी तीन पक्षांचे सदस्य सभागृहात किती एकत्रितपणे राहतात, यावर सभागृहाचे कामकाज अवलंबून असणार आहे. तीन पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांकडे पाठ फिरविल्यास विरोधक आक्रमकपणे त्यांच्यावर तुटून पडतील यात शंका नाही. त्यामुळे यावेळी प्रथमच सत्ताधाऱ्यांपेक्षा प्रशासनावर आक्रमक विरोधकांचा वचक राहण्याची शक्यता बळावली आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांची लागणार कसोटी
By admin | Published: April 26, 2017 12:19 AM