प्रदीप भाकरे अमरावती : नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी ३ जुलै रोजी राजापेठस्थित मध्य झोन कार्यालय, तेथीलच मालमत्ता कर विभाग, एनयुएलएमविभाग, पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर व बाजार परवाना विभागाची पाहणी केली. उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्हाण, उपअभियंता प्रमोद इंगोले उपस्थित होते. कलंत्रे यांनी २ जुलै रोजीच महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर बुधवारी त्यांनी प्रशासकीय व्यवस्था जाणून घेतली. कलंत्रे यांच्या नियुक्तीमुळे अमरावती महापालिकेला एन. नविन सोना यांच्यानंतर आयएएस आयुक्त मिळाले आहेत. सोना हे १० जून २०१० ते ३१ ऑगस्ट २०१२ पर्यंत येथे कार्यरत होते हे विशेष.
यावेळी आयुक्तांनी चारही कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यालयाची रचना व विभागांची व्यवस्था जाणून घेतली. विविध विभागप्रमुखांची व अधिका-यांची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्थेची पाहणी करत त्यांनी माहिती जाणून घेतली. मनपा झोन क्र.२ व ३ येथे नागरिकांकरीता मालमत्ता कर भरण्यासाठी संगणकीकृत नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावेळी नवीन मालमत्ता कर भरण्याकरिता झोन कार्यालयात आबालवृद्ध व महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. झोनच्या कर्मचा-यांमार्फत ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन नागरिकांना सहकार्य केले जात असल्याचे निरिक्षण कलंत्रे यांनी नोंदविले. सोबतच, ३ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास आयुक्तांनी मनपा मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ११ व मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक १३ दस्तूर नगर येथे आकस्मिक भेट दिली.
महानगरपालिकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारची सेवा दिली जाते. मालमत्ता कर वसुली करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्मार्ट पॉस मशिनद्वारे अधिकाधिक मालमत्ता कर वसुली करावी. मालमत्ता कराबाबत झोनस्तरावर व विविध परिसरात जनजागृती करण्याचे निर्देश दिलेत.सचिन कलंत्रे, महापालिका आयुक्त