अमरावती : शहरातील मोठ्या नाल्यांमध्ये कचरा साचून राहण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. महापालिका सफाई कर्मचारी नाल्यातून कचरा, गाळ बाहेर काढत नसल्याने रहिवासी नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाल्यातील कचरा साफ करावा, अशी मागणी आहे.
-------------
गोपालनगरातील अंतर्गत रस्ते नादुरूस्त
अमरावती : स्थानिक गोपालनगरातील अंतर्गत रस्ते नादुरूस्त झाले आहे. गोपालनगर ते एमआयडीसी, मराठा कॉलनी, माया कॉलनी आदी नागरी वस्त्यांमधील रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ते दुरुस्ती, निर्मितीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
------------------
परकोटालगत कचरा समस्या
अमरावती : स्थानिक इतवारा बाजार ते जवाहर गेट दरम्यान ऐतिहासिक परकोटालगत कचरा समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. परिसरातील दुकानदार, व्यापारी व हातगाडी व्यावसायिक परकोटालगत कचरा आणून टाकत असल्याचे चित्र आहे. परकोटाचे सौंदर्यीकरण करण्यात आले असताना कचऱ्यामुळे विद्रुपीकरण होत आहे.
--------------
विद्यापीठ उड्डाणपुलाखाली अतिक्रमण
अमरावती : येथील विद्यापीठ उड्डाणपुलाखाली हातगाडी, छोटे व्यावसायिकांनी अतिक्रमण चालविले आहे. एकाच बाजूने वाहतूक होत असून, येथून जडवाहतूक नियमित सुरू राहते. रस्त्यालगतच्या दुकानदारांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्यालगतच्या व्यावसायिकांना बाजूला करावे, अशी मागणी आहे.
-----------------
साईनगरात अंतर्गत रस्त्याची दैना
अमरावती : स्थानिक साईनगरात अंतर्गत रस्त्याची दैना झाली आहे, अकोली मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे. नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहे. रेल्वे स्थानक मार्गावरही हीच स्थिती असून, वाहनचालक हैराण झाले आहे.