अमरावती : गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीत दाखल झाल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून संबंधितांकडून त्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली तथा अटक आरोपींचीही झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही.
‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नूपुर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तपासही केला. मात्र, कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध नसल्याचा निर्वाळा अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला.
अमरावतीत हत्येचा थरार! मुलगा, सुनेसमोर मेडिकल स्टोअर संचालकाचा गळा चिरला
या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेपासून दूर असलेला सहावा आरोपीच या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार आहे. त्यानेच आपल्याला कामे वाटून दिल्याची कबुली अन्य आरोपींनी दिली. शुक्रवारी एनआयएच्या नागपूरस्थित कार्यालयाची एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू पोहोचली. दरम्यान, या घटनेचा तपास एनआयएकडे सोपविला गेलेला नाही. मात्र, ती केवळ फॅक्ट फाइंडिंगसाठी आल्याचे एका अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.
...तर सत्यता पुढे येईल : खासदार डॉ. अनिल बोंंडे
येथील मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांचा खून झाला. यामागे बरेच काही दडले आहे. विशिष्ट प्रवृत्ती यामागे सूत्रधार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ने करावा, अशी मागणी केली होती. ती शासनाने मान्य केली असून, तपास चमू अमरावती येथे पोहोचल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आता एनआयएच्या माध्यमातून तपास झाला तर कोल्हे कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.