अमरावती : बेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नाइट लँडिंगची सुविधा मिळणार असून, त्याकरिता निविदा काढण्यात येणार आहे. विमानतळाच्या संरक्षण भिंतीची कामे पूर्णत्वास आली आहेत. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करण्याबाबत एमएडीसीने निर्णय घेतला आहे.
एटीआर-७२ विमाने उतरण्याची सुविधा व नाइट लँडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी ‘एमएडीसी’कडून राईटस् लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण, तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे.
विमानतळाचे अद्ययावतीकरण होणार
बेलोरा विमानतळाचे अद्ययावतीकरणाच्या कामाची जबाबदारी शासनाने ‘एमएडीसी’कडे सोपविली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-७२ किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. येथे रात्रीच्यावेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. उडान ३.० मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाइन्स यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पाणी, वीज सुविधांसह वळण रस्त्याचे काम पूर्ण
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विमानतळाला पाणीपुरवठा, महावितरणमार्फत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या संरक्षक भिंतीची उभारणी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येत असून, त्याची निविदा काढण्यात येणार आहे. धावपट्टीची लांबी १३७२ वरून१८५० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
सुविधांसाठी १५ कोटींचा खर्च
अमरावती विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा व्हावी, यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च येईल. प्रकाश योजनेसह सर्व सुविधा उभारल्यानंतर डीजीसीएकडून पाहणी केली जाईल आणि नाइट लँडिंगची परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.