मनीष तसरे
अमरावती : लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स सहसा रात्री प्रवाशांच्या जेवणाकरिता ठरलेल्या हॉटेल किंवा ढाब्यावर थांबतात. मात्र अनेकदा प्रवाशांची हॉटेल संचालकडून चढ्या दरात जेवण अथवा खाद्यपदार्थांची विक्री करून आर्थिक लूट होताना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सोमवारी रात्री केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत लक्षात आले. मात्र, असे असताना प्रशासन मात्र यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही.
ट्रॅव्हल्स चालकांचे ‘फिक्स’ असलेल्या हाॅटेलवर त्यांचा थांबा असतो. ट्रॅव्हल्स ज्या हॉटेल्सवर थांबतात तिथे त्या प्रवाशांच्या जेवणाकरिता जास्तीत जास्त अर्धा तास थांबतात. अशावेळी बऱ्याच जणांसोबत लहान मुले असतात, तर कधी वृद्ध असतात. अनेक जण कमीत कमी खर्चात जेवण कसे होईल हेच बघतात. अशावेळी जवळपास दुसरे हॉटेल अथवा ढाबा राहत नाही. असले तरी लांब अंतरावर असते. त्या हॉटेलवर जेवणासाठी गेलो अन ट्रॅव्हल्स निघून जाईल, याचीच भीती असते. मात्र, भूक लागलेली असते, कधी छोटी मुले हट्ट करतात. पटकन जेवण करायचे नाहीतर गाडी निघेल. ही पण काही कारणे आहेत. त्यामुळे प्रवास ज्या प्रकारचे जेवण वा फूडस् आहे, त्या भावात विकत घेतात. काहीही प्रश्न किंवा छापील किंमत बघत नाही, हे वास्तव आहे.
‘लोकमत’ ने काय पाहिले?
सोमवारी रात्री वाजताच्या १०च्या सुमारास बडनेरा ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी १२ वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या २५ ट्रॅव्हल्स थांबल्या. या ठिकाणी दुसरे कुठलेही हॉटेल वा ढाबा नसल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. या ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवाशांनी या हाॅटेलमध्ये जेवण केले. जेवणानंतर अनेकांनी बिलासंबंधी विचारणा केली असता दरामध्ये बराच फरक आढळून आला. मात्र अनेकांना पुढचा प्रवासाला जायचे असल्याने कोणताही वाद अथवा वेळ न घालवता निघून गेले
पाण्याची बॉटल २० रुपये
अमरावती-अकोला मार्गावरील एका हॉटेलवर रात्री लांब पल्ल्याच्या अनेक ट्रॅव्हल्स येथे थांबतात. काही प्रवासी या ठिकाणी येथे जेवण करतात, तर काही प्रवासी चहा-पाणी घेतात. मात्र या ठिकाणी पाण्याची बॉटेल २० रुपयाला मिळते. बॉटलवर छापील किमत ही १५ रुपये एवढीच आहे, हे पाहणीत लक्षात आले. बाॅटल चिलिंगच्या नावावर या ठिकाणी नी प्रवाशांची लूट होत असल्याचे या ठिकाणी दिसून आले.
स्वच्छता नाहीच
नागपूर, अमरावतीहून पुढे नाशिक, मुंबई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ठराविक हॉटेलवर थांबतात. तेव्हा अनेक प्रवासी प्रसाधनगृहात जातात. मात्र या ठिकाणी स्वच्छता मात्र दिसून आली नाही.
सुरक्षादेखील नाही
प्रवासादरम्यान अनेकजण मद्यपान करतात. हाॅटेलमध्ये मद्यपान करणाऱ्यांकरिता वेगळी व्यवस्था असायला हवी. मात्र या हाॅटेलवर तशी दिसून आली नाही. त्या कारणाने महिला या ठिकाणी असुरक्षित असल्याचे दिसून आले.
हाॅटेल संचालक अन्न परवानाकरिता अर्ज करतात. नियमात असेल तर आम्ही परवानगी देताे. मात्र पाण्याच्या बॉटलचे जास्त पैसे घेत असतील तर त्याबाबत आम्ही काही करू शकत नाही.
- शरद कोलते, सहआयुक्त, अन्न व औषधी प्रशासन