अपघाती मृत्यूने गाव हळहळले
ते शब्द ठरले शेवटचे : कृषीरत्न पुरस्कारार्थीचा अपघाती मृत्यू
फोटो पी ०२ निखील डुबे
धामणगाव रेल्वे : वयाच्या बारा वर्षांपासून शेतात राबराब राबून नवीन जोडपीक घेतल्याने गुरुवारी आपल्याला कृषिदिनी कृषिरत्न पुरस्कारासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे नित्यप्रमाणे सकाळी आंघोळ करून देवपूजा केली. मोठा मुलगा निनाद व चिमुकली रियाला आवाज देत मी लवकर पुरस्कार घेऊन परत येतो, असे सांगितले. मात्र, या चिमुकल्यासाठी जन्मदात्याची ही हाक शेवटची ठरली. युवा शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गाव हळहळले.
तालुक्यातील अडीच हजार लोकवस्तीचे आजनगाव हे गाव. येथील निखिल नंदकिशोर डुबे (३९) या युवा शेतकऱ्याचा गुरुवारी रात्री १० वाजता चारचाकी वाहनाचा मलातपूर फाट्याजवळ अपघातात मृत्यू झाला. शेतातील कारली वेलासाठी लागणाऱ्या वेळूकरिता तळेगाव दशासर येथून घरी परतताना स्वतःच्या चार गाडीने हा अपघात झाला. या वाहनाने दोन पलटी घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निखिल हा वयाच्या बारा वर्षांपासून स्वतः, वडील व मोव्या भावाच्या नावाने असलेली २० एकर शेती सांभाळत होता. पारंपरिक शेती न करता सात वर्षांपासून शेतात वाल, काकडी, मिरची, कारली भाजीपाल्याचे उत्पादन घेणे सुरू केले. त्यातून टिप्पर, ट्रॅक्टर असे वाहन घेऊन जोडधंद्याला उभारी दिली. या बाबीची दखल घेत पंचायत समितीच्या वतीने कृषिदिनी कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. आपण केलेल्या कार्याचे चीज झाल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या.
शून्यातून विश्व निर्मिती
आजनगावात वडिलांच्या नावाने शेती असली तरी निखिलचा स्वतःच्या मेहनतीवर प्रचंड विश्वास होता. प्रथम सोयाबीन, कपाशी हे पारंपरिक पीक घेणे सुरू केले. मात्र, या पिकापेक्षा नगदी स्वरूपात उत्पन्न देणारे पीक घ्यावे म्हणून सात वर्षात मिरची, कारले, वाल शेंग ही पिके घेणे सुरू केले. तालुक्यात मिरचीचे विक्रमी पीक घेणारा निखिल एकमेव शेतकरी ठरला होता. कॉंग्रेस पक्षाचा पक्षनिष्ठ कार्यकर्ता तसेच आजनगाव ग्रामपंचायत सदस्य होता. त्याच्या मागे आई, वडील, पुण्याला प्राध्यापक असलेला मोठा भाऊ राहुल, स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये इयत्ता दुसरीत शिकणारा मुलगा निनाद, याच शाळेत नर्सरी ग्रुपमध्ये गेलेली चार वर्षांची मुलगी रिया आहे. शुक्रवारी निखिलच्या पार्थिवावर आजनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळताना पाहायला मिळाले. त्यांच्या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.