लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून लागू केलेली इंटरनेट बंदी १९ रोजी दुपारी ३ वाजता संपुष्टात आली. संचारबंदीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ९ पर्यंत संचारबंदी ‘जैसे थे’ असेल. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शुक्रवारी हे आदेश पारित केले. बँक, शासकीय कार्यालये, जीवनावश्यक वस्तू, कृषी केंद्र, विद्यार्थ्यांसाठी हा हितकारी निर्णय घेण्यात आला. दरम्यान, इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्याने अमरावतीकरांचा जीव भांड्यात पडला आहे. शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली असली तरी आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, धर्म, पंथ, अशांच्या भावना दुखावल्यास समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती पोस्ट करणाऱ्या इसमास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शुक्रवारी पारित केले आहेत. दरम्यान, आतापयर्यंत २९८ आरोपींना अटक करण्यात आली असून दाखल गुन्ह्यांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर व्हॉटस्ॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या समाज माध्यमांवर व्यक्त होतानाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी आयुक्तालय क्षेत्रात सोशल माॅनिटरिंग सेल’ स्थापन करण्यात आला आहे. शहरात झालेल्या दंगलीच्या संदर्भाने खोटे मॅसेज किंवा अफवा सोशल मीडियावर पसरविण्यास, तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यास व ग्रुप ॲडमिनला प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे कृत्य केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपी व एसीपीद्वय फ्रंटफूटवर खेळत आहेत. नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम, गाडगेनगरचे आसाराम चोरमले व खोलापुरी गेटचे पंकज तामटे हे रात्रीचा दिवस करीत आहेत. दररोज ठाणेदार जागत आहेत. त्यात सहायक पोलीस आयुक्तद्वय पूनम पाटील व भारत गायकवाड हेदेखील तसूभरही कमी नाहीत. ते ‘२४ बाय ७ ऑन फिल्ड’ आहेत.
यांनीही सांभाळली धुरावरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटेंकडे आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी असली तरी त्यांच्यातील अनुभव हेरून त्यांनादेखील फ्रंटफूटवर उतरविण्यात आले. सोबतीला शहरातील गुन्ह्यातील गुन्हेगारांची खडानखडा माहिती असणाऱ्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनादेखील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. दोन्ही डीसीपीदेखील अतिसंवेदनशील व संवेदनशील अशा स्थळांसह नजर रोखून आहेत. शहरात इंटरनेट बंदी असली तरी अनेक ठिकाणी ते सुरू असल्याने कुणी आक्षेपार्ह संदेश व्हायरल तर करीत नाही ना, यावर सायबर ठाणेप्रमुख सीमा दाताळकर, एपीआय रवींद्र सहारे हे लक्ष ठेवून आहेत.
गंभीर गुन्ह्यांची नोंदआरोपींच्या अटकेपूर्वी सूक्ष्म परिस्थितीजन्य पुरावे एकत्र केले जात आहेत. त्यामुळेच १३ नोव्हेंबर रोजी झालेली जाळपोळ, दगडफेक, चिथावणीखोर वक्तव्य व हिंसाचारापोटी १८ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अव्याहत सुरू आहे. आंदोलक व हल्लेखोरांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने हजारो जणांनी शहरातून पळ काढला आहे. अटकसत्रात सबब अडचणी निर्माण होत आहेत.
'ओन्ली ॲडमिन'पुढील काही दिवसांकरिता व्हॉटस्ॲप ग्रुप ॲडमिननी ‘ओन्ली ॲडमिन’ अशी सेटिंग करावी तथा सजग राहून शहरात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.