विविध संघटनांचा पाठिंबा : विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा चौथा दिवस अमरावती : शासनाने शिक्षक व कर्मचाऱ्यांचे १५ वर्षांपासून रक्त शोषण केल्याचा आरोप करीत शिक्षकांनी शनिवारी प्रतिकात्मक रक्तदान करून शासनाचा निषेध केला. उपोषणाचा हा चवथा दिवस असून चार शिक्षकांची प्रकृती खालावल्याने त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल केले आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समिती अंतर्गत सर्व विभागीय स्तरावर विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अनुदान व अघोषित शाळा घोषित करून तत्काळ अनुदान द्यावे, या मागणीसाठी शिक्षकांचे उपोषण सुरू आहे. शनिवारी आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली असून आतापर्यंत शिक्षकांना अस्वस्थ वाटल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आतापर्यंत शासनाच्या विरोधात मुंडन, शासनाची तिरडी, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास घेराव अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा निषेध केला आहे. सततच्या पाठपुरवठ्यानंतर शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्याने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शिक्षकांनी केला आहे. शनिवारी शासनाच्या विरोधात प्रतिकात्मक रक्तदान आंदोलन केले. यासाठी शेकडों शिक्षकांनी नोंदणी केली व रक्तदान करून शासनाच्या निर्दयी भूमिकेचा निषेध केला. जोपर्यंत शासन सकारात्मक पवित्रा घेणार नाही, तोवर सर्व शिक्षक मागे हटणार नाही, असा निर्धार या शिक्षकांनी व्यक्त केला. या आंदोलनाला पाठिंबा घोषित करून आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी अमरावती विभागातील काही समविचारी संघटना ६ जून रोजी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शासनाने विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण न करता शिक्षकांचे शोषण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी आंदोलनस्थळी प्रतिकात्मक रक्तदान आंदोलन करण्यात आले. शासनाने वेळीच निर्णय घेऊन शिक्षकांवरील अन्याय थांबवावा, असे आवाहन कृषी समितीचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आंदोलनात मान्यवर सहभागीअमरावती : पुंडलिक रहाटे, एस.के. वाहूरवाघ, सुरेश सिरसाट, दीपक देशमुख, आर.जी. पठाण, गोपाल चव्हाण यांनी ते आवाहन केले आहे. आंदोलनात कार्याध्यक्ष सुरेश सिरसाट, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, सुनील डहाके, गजानन कानडे, अनंतकुमार आंबे, मोहन पांडे, सिद्धार्थ सिरसाट, विजय राठोड, यू.आर. उके, दीपक काळे, पुरुषोत्तम करसकर, विजय तुपकर, सचिन आयनवार, ओंकार राठोड, प्रशांत शिंदे, प्रवीण नागरे, विठोबा जायभाये आदिंनी रक्तदान केले.या प्रतिकात्मक आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, शिक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष संगिता शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उर्दू टिचर असोसिएशनचे अध्यक्ष गाजी जोहरोश, निवृत्त शिक्षणाधिकारी डी.आर. देशमुख, पंडित पंडागरे, अशोक वाकोडे, प्रहार संघटनेचे दीपक धोटे, विजुक्टाचे प्रकाश काळबांडे, प्रजासत्ताक संघटनेचे सुभाष गवई, शिक्षक आघाडीचे दिलीप पाटील राणे, पुरुषोत्तम दहीकर, विमाशिचे दिलीप कडू व आधार सेवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष लतिश देशमुख यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवून मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
नऊ शिक्षक अत्यवस्थ; रक्तदानाने शासनाचा निषेध
By admin | Published: June 04, 2016 11:58 PM