अमरावती : कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सक्षम उपचार यंत्रणेसह आवश्यक त्या सर्व सुविधांची उभारणी करण्यासाठी शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा, आवश्यक साधनसामग्री मिळवून देत आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.
आरोग्य विभागातर्फे नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, तालुका, ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत. म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका लक्षात घेऊन दोन स्वतंत्र वॉर्ड आकारास येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बॉक्स
या तालुक्यांना रुग्णवाहिका
या नऊ रुग्णवाहिका अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, चांदूर बाजार, चुरणी, वरूड, अचलपूर, तिवसा, जिल्हा स्त्री रुग्णालय व दर्यापूर येथील रुग्णालयांत उपलब्ध राहतील. त्याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आणखी पाच रुग्णवाहिका लवकरच जिल्ह्यात प्राप्त होतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. या रुग्णवाहिका सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत.