फोटो - रस्त्याचा पाहतो.
महामार्ग धोकादायक, जरुडात गतिरोधक बसविण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा जरूड : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या लौकीकप्राप्त जरूड येथे सुसाट वाहनांचे नऊ बळी झाले आहेत. डाॅ. हेमा पाटील, जयवंत यावले, विठ्ठलराव धस, जयवांताबई खत्री, उत्क्रांती शाळेच्या बेनोडा येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचाही यात समावेश आहे. महामार्गावर हे अपघात झाले आहेत.
जरूड येथील बस स्थानकापुढून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. वरूड-अमरावती महामार्गावरील हे गाव २२ हजार लोकवस्तीचे आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बाळासाहेब देशमुख कन्या शाळा, जरूड हायस्कूल जरुड, विवेकानंद इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, शशिकलाबाई बोरकर प्राथमिक शाळा, कला वाणिज्य महाविद्यालय, उत्क्रांती शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आहेत. यात एकूण ३५०० विद्यार्थी दररोज शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना ८० फूट रुंदीचा महामार्ग आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. महामार्गाच्या नव्याने झालेल्या रुंदीकरणात लावलेल्या दुभाजकामुळे येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. येथे जर गतिरोधक बसविण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोशन दारोकर यांनी दिला आहे.
यापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे गतिरोधक बसविण्यासाठी मोठे जनआंदोलन झाले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन गावात तीन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. परंतु एचजी इन्फ्रा या कंपनीने केलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे पूर्वी असलेले गतिरोधक नाहीसे झाले. नवीन रस्त्यावरून अवैध वाहतूकदार वाहने सुसाट पळवितात, अशी विद्यार्थी, ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण प्रशासनाला मिळविता आलेले नाही. वाहतूक नियमन करण्यासाठी येथे उभे केलेले अधिकारी, कर्मचारी फक्त शोभेची वस्तू ठरले आहेत. गतिरोधक बसवण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार पत्रव्यवहार, विनंती करूनसुद्धा फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने जरूडकरांचे प्राण धोक्यात आले आहे.
-----------
जरूड हे तालुक्यातील मोठे गाव आहे. वरूड-अमरावती महामार्गावरच सर्व शाळा आहेत. या मार्गावर वाहतूक सुसाट असल्याने त्यांच्यावर नियंत्रणासाठी गतिरोधक आवश्यकच आहे. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
- किशोर गावंडे, तहसीलदार, वरूड
---------------
माझी पत्नी डॉ. हेमा पाटील यांना रस्ता अपघातात गमावले. त्यानंतर महत्प्रयासाने येथे गतिरोधक लागले. परंतु, महामार्ग निर्मितीत हे गतिरोधक नष्ट झाले. आता किती जणांचे प्राण गेल्यानंतर पुन्हा गतिरोधक बसविले जाणार आहे?
- डॉ. सुशील पाटील, जरूड