अमरावती: स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ) येथे एका नऊ वर्षाच्या चिमुकलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. या चिमुकलीच्या हृदयाला जन्मत:च छिद्र होते. त्यामुळे तिचा जीव वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक होती.
जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका नऊ वर्षाच्या चिमुकलीला हृदयाचा त्रास होता. जन्मताच तिच्या हृदयाला १८ एमएमचे छिद्र होते. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी किंवा ए.एस.डी डिवाइसने पायाच्या नसांमधून सर्जरी करण्यात येते. या चिमुकलीवरही पायाच्या नसंमधून शस्त्रक्रिया करून हृदयामध्ये असलेले छिद्र बंद करण्यात आले. ही शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय रोगतज्ज्ञ डॉ. भूषण सोनवणे, डॉ. आदित्य गुप्ता, डॉ. नागलकर, इन्सेंटीवीस डॉ. स्वप्निल रुद्रकार, डॉ.भाविक चांगोले, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. माधव ढोपरे, डॉ. श्याम गावंडे, मिनल काणसे यांनी यशस्वी केली.