परतवाडा (अमरावती) : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत देशपातळीवर ६ हजार ३८ शाळांना नव्याने अटल टिंकरिंग लॅब देण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील ५५४ आणि विदर्भातील ८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना ३१ जानेवारी २०२०पर्यंत सर्व प्रक्रिया करावयाच्या आहेत. मुलांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात जिज्ञासा वाढावी, त्यांनी नव्या उपकरणांची निर्मिती करून संशोधनाकडे वळावे, या हेतूने अटल टिंकरिंग लॅब शाळांना मान्य करण्यात आल्या आहेत. वैज्ञानिक साधने व विविध उपकरणांसाठी नीती आयोगाकडून निधी दिला जाणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित विषयातील संकल्पना शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवून त्यांचे कौशल्य विकसित करण्याकरिता आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याकरिता निवड झालेल्या शाळांना अर्थसाहाय्य केल्या जाणार आहे. प्रभारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विदर्भातील ८८ पैकी नागपूर जिल्ह्यात २४, अमरावती २०, गोंदिया ९, यवतमाळ ८, गडचिरोली ७, अकोला ५, चंद्रपूर ४, भंडारा ३, बुलडाणा ३, वर्धा ३ आणि वाशिम जिल्ह्यात २ शाळांचा समावेश आहे. ग्रामीण भागासह आदिवासी आश्रमशाळांचीही याकरिता निवड करण्यात आली. यापूर्वीही नीती आयोगाकडून वेगवेगळ्या शाळांना अटल टिंकरिंग लॅब दिल्या आहेत. ----------------अचलपूर तालुक्यात आठ शाळांना लॅब अमरावती जिल्ह्यातील २० शाळांमध्ये अचलपूर शहरातील राष्ट्रीय हायस्कूल, परतवाडा शहरातील आयईएस गर्ल्स हायस्कूल व म्युनिसिपल हायस्कूल यांचा समावेश आहे. या शाळांना ब-याच प्रतीक्षेनंतर ही लॅब मंजूर झाली. अचलपूर तालुक्यातील जनता हायस्कूल (शिंदी बु.), जनता हायस्कूल (हरम), जनता हायस्कूल (परसापूर) व स्वरूपसिंह हायस्कूल (पथ्रोट) आणि दत्ताप्रभू आश्रमशाळा (पिंपळखुटा) येथेही अटल टिंकरिंग लॅब मान्य करण्यात आली आहे. ----------------सर्वप्रथम लाभ करजगावलाअमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वप्रथम करजगाव येथील शंकररराव विद्यालयाला यापूर्वीच अटल टिंकरिंग लॅब नीती आयोगाकडून देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स , मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल किट्स, थ्री-डी प्रिंटर, ड्रोन, टेलिस्कोप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, रोबोटिक्स, शोल्डरिंग किट्स, विविध प्रकारचे सेन्सरसह अन्य प्रकारचे साहित्य करजगाव येथील लॅबला नीती आयोगाकडून मिळाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी ते हाताळत आहेत.
नीती आयोगाकडून राज्यातील ५५६ शाळांना अटल टिंकरिंग लॅब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:31 PM