ऑनलाईन लोकमतअमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी, गजलकार व साहित्यिक नितीन देशमुख यांना साहित्यक्षेत्रात अतिशय सन्मानाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर काव्यप्रतिभा पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद (भोसरी) यांचा संयुक्त विद्यमाने पुणे येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील बेलोरा या लहानशा गावातून आपला जीवनप्रवास सुरू करणारे गझलकार नितीन देशमुख यांना गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार पटकावला. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अभिनेते सुबोध भाव व ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यापूर्वी नितीन देशमुख यांना नारायण सुर्वे पुरस्कार त्यांच्या ‘बिकॉज वसंत इज कमिंग सून’ या पुस्तकाला मिळाला होता. याशिवाय २० वर्षांच्या अविरत काव्यप्रवासात अ.भा. मराठी नवोदित संघ, सोलापूरचा डॉ. विठ्ठल वाघ पुरस्कार तसेच अनेक सन्मानाचे नितीन देशमुख हे मानकरी ठरले आहेत. महाराष्ट्राबाहेर तसेच देशाबाहेरही अविट गोडीची काव्यप्रसुती व सादरीकरणाने नितीन देशमुख यांनी काव्यरसिकांच्या काळजात अभेद्य स्थान निर्माण केले आहे.गदिमा पुरस्कार माझा नसून, कवितेवर, गजलेवर नितांत प्रेम करणाऱ्या रसिक व मित्रांचा आहे.
नितीन देशमुख