अमरावती : नोव्हेंबर महिन्यातील महापालिकेची स्थगित आमसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. परंतु माजी मुख्यमंत्री बॅरि. ए. आर. अंतुले यांच्या निधनाने ही स्थगित सभा पुन्हा स्थगित करण्यात आली. केवळ प्रशासकीय प्रस्तावावर अडीच तास चर्चा झाली परंतु यावर निर्णय मात्र घेण्यात आला नाही.महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी सकाळी १० वाजता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. परंतु कोरम अभावी ही सभा अर्धा तासाकरिता स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला प्रशासकीय विषय चर्चेला आले. भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी जीवन प्राधिकरणने २२ करोड रुपयांची मागणी केल्याचा हा प्रशासकीय विषय होता. या विषयावर सदस्यांनी चर्चा करुन जीवन प्राधिकरणाची मागणी फेटाळून बेकायदेशीर असल्याचे सांगितले. जीवन प्राधिकरणला पहिल्या टप्प्यात १०४ कोटी व दुसऱ्या टप्प्यात ८५ कोटी रुपये दिले. त्यानंतरही भुयारी गटार योजनेचे काम रखडलेलेच आहे. त्यापेक्षा ही योजना महापालिकेने राबविण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.त्यानंतर बडनेऱ्यातील मोदी हॉस्पिटल सामाजिक संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव आयुक्तांमार्फत सभागृहात ठेवण्यात आला. या प्रस्तावालाही नगरसेवकांनी विरोध केला. गोरगरिबांसाठी असलेले हे रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यासाठी दिल्यास रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता नगरसेवकांनी वर्तविली. महापालिकेच्या शाळा ज्याप्रमाणे बंद पाडल्या जात आहेत, तशेच महापालिकेचे रुग्णालयही बंद पाडणार आहोत काय, असा सवाल सदस्यांनी प्रशासनाला केला. मोदी हॉस्पिटलमध्ये केवळ बडनेरा शहरातीलच नव्हे आजुबाजुच्या खेड्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरती करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी करावी, असे सांगून हा प्रस्ताव फेटाळला अडिच तास चाललेल्या या चर्चेनंतर मुस्लिम लिगचे नगरसेवक मोहम्मद इमरान यांनी माजी मुख्यमंत्री बॅरि. ए. आर. अंतुले यांच्या निधनामुळे त्यांना श्रध्दांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता मिळाली व श्रध्दांजलीनंतर स्थगित सभाही स्थगित करण्यात आली.
महापालिकेची आमसभा निर्णयाविना पुन्हा स्थगित
By admin | Published: December 02, 2014 10:58 PM