लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेला आर्थिक विपन्नावस्थेतून बाहेर काढण्याच्या हेतूने आयुक्त आणि स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी हाती घेतलेल्या मालमत्ता शोध मोहिमेला यश आले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार पाचही झोनच्या सहायक आयुक्त व करलिपिकांनी तब्बल २०,१२६ नव्या मालमत्ता शोधून काढल्यात. या नव्या मालमत्तांमुळे कर मागणीत ९ कोटी २७ लाखांची घसघसीत वाढ झाली आहे. ४ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या कर विभागाच्या आढाव्यानंतर ही माहिती देण्यात आली.शहरातील अनेक मालमत्ता कराच्या अखत्यारित नसल्याची बाब उघड झाल्यानंतर आयुक्त हेमंत पवार आणि स्थायी सभापती तुषार भारतीय यांनी पुढाकार घेतला. योगेश पिठे, मंगेश वाटाणे, सुनील पकडे, सोनाली यादव, अमित डेंगरे आणि निवेदिता घार्गे या सहायक आयुक्तांनी संधी म्हणून हे आव्हान स्वीकारले. बदल्या स्थगित करून करवसुली लिपिकांना टार्गेट देण्यात आले. मे महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान पाच झोनमध्ये २०,१२६ मालमत्ता कराच्या अखत्यारित आणण्यात आल्या. पाचही सहायक आयुक्त व वसुली लिपिकांनी प्रतिसाद दिल्याने मालमत्ता कराच्या मागणीत घसघशीत वाढ झाली. ३३५० मालमत्तांना योग्य कर लावण्यात आलेला नव्हता. त्याचे उचित करमूल्यनिर्धारण करण्यात आले. ८,३२३ मालमत्ता नव्याने कराच्या अखत्यारित आल्यात. ३७९ मालमत्तांमधील बदल नोंदवत त्यांना योग्य कर आकारणी करण्यात आली. ७००९ मालमत्ता अनधिकृत आढळून आल्याने त्यांचेकडून दुप्पट कर आकारण्यात आला. नव्या मालमत्ता कराच्या आकारणीत आल्याने २०१७-१८ या आर्थिक वर्षाची एकूण मागणी ४६ कोटी ३४ लाख ४७ हजार ३८ रुपयांवर पोहोचल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ३१ जुलै पर्यंत १९०६१ मालमत्तांवर कर आकारणी करण्यात आली होती.ती संख्या ३१ आॅगस्टपर्यंत वाढून २०१२६ पर्यंत पोहोचली आहे.या पंधरा दिवसात १०६५ मालमत्तेवर १०६५ मालमत्तेवर कर आकारणी करण्यात आली. त्यामुळे कराची मागणी ८ कोटी ४९ लाख ६४ हजार ८३९ रुपयांवरुन ९ कोटी २७ लाख ९७ हजार ७९६ रुपयांवर पोहोचली आहे.
महापालिकेने शोधल्या २०१२६ मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 10:54 PM
महापालिकेला आर्थिक विपन्नावस्थेतून बाहेर काढण्याच्या हेतूने आयुक्त आणि स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी हाती घेतलेल्या मालमत्ता शोध मोहिमेला यश आले आहे.
ठळक मुद्देझोनस्तरावर मूल्यांकन : ९.२७ कोटींनी वाढली मागणी