अमरावती : अर्धा मृग संपला तरी पावसाचे ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ची टीव-टीव कानी पडत नसल्याने शेतकरी बुचकळ्यात आहेत. त्यातच ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाची बाधा आल्याने मान्सूनचा वेग कमी झाल्याच्या वार्तेनेही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजासोबत शेतकरी पावसाचे पूर्वानुमान देणाऱ्या पारंपरिक संकेतांचाही अंदाज घेतात. त्यानुसार मृग नक्षत्रात म्हणजेच या दिवसात पावसाची टीव-टीव सुरू होत असते. म्हणजेच काही दिवसांत पावसाळा सुरू होत आहे. आता पेरणीच्या कामाला लागा, असा तो एकप्रकारे संकेत देत असतो, यावेळी ग्रामीणमध्ये पावसाचा आवाज कमी येत आहे, त्यामुळे पावसाला उशीर होत असल्याची चर्चा आता शेतकरी करू लागले आहे.
निसर्ग काही संकेत देत असतो व त्याचे अनुकरण आजही शेतकरी करतात. निसर्गातील झाडे, पशुपक्षी, त्यांचे आवाज, घरटी, काही कीटक यांच्या वागण्यात काहीसा बदल येतो, म्हणजेच पाऊस आता येणार असे ते पूर्वसंकेत मानले जातात. या ठोकताळ्यांशिवाय पंचाग, नक्षत्र व त्याचे वाहन यावर पावसाचा अंदाज ग्रामीण भागात बांधला जातो. यंदा मात्र, या पूर्वापार अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.