अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा होत असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकरी बांधवाला भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.
नुकसानीचा तपशील अचूक नोंदवा
जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, तहसीलदार नीता लबडे यांच्यासह पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरावती तालुक्यात ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन, शिराळा परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. घरांची पडझड, शेतीपिकांचे नुकसान आदींबाबत प्रत्येक तपशील अचूक नोंदवा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भातकुली तालुक्यात साऊर, रामा येथे घराच्या पडझडीबाबत पंचनामे सुरू झाले. साऊर येथे दीडशे घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आहे. नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीचे पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली.
शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा
घरांच्या पडझडीची पंचनाम्याद्वारे नोंद घेतानाच शेतीपीकाच्या नुकसानाचे पंचनामेही तात्काळ पूर्ण करावेत. कृषिसहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून ही प्रक्रिया गतीने राबवा. जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, शेतकरी बांधवांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ना. ठाकूर यांना दिली.
कोरोनाकाळात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यात अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता बाळगून शेतकरी बांधवांची सुसंवाद साधून प्रत्येक नुकसानाची अचूक दखल घेत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.