(फोटो)
प्रवासी आल्यापावली परतले, अन्य डेपोच्या केवळ दोन बस
परतवाडा : स्थानिक एसटी डेपोतून प्रवाशांच्या सेवेत मंगळवारी एकही बस धावली नाही. बुधवारीही हीच स्थिती या स्थानकावर होती. परतवाडा आगाराच्या ६५ एसटी बस एकाच जागी आवारात उभ्या होत्या.
लॉकडाऊनच्या अनुषंगाने मंगळवारी प्रवासी बसस्थानकावर मूळ गावी जाण्याकरिता बस स्थानकार आले. काही चौकशी करून गेले, पण या सर्व प्रवाशांना आल्यापावलीच परतावे लागले. काही आदिवासी बांधव बसच्या प्रतीक्षेत तासंनतास बसून असल्याचे दिसून आले. अखेर या प्रवाशांकरिता एम.एच.४०, वा. ५५९३ क्रमांकाची बस परतवाड्यावरून धारणीकरिता सेमाडोह मार्गे सकाळी ११.३० च्या दरम्यान सोडण्यात आली आणि बस स्थानक रिकामे झाले. दुपारी ३ नंतर डेपोत शुकशुकाट होता.
दरम्यान, बडनेरा आगाराची एक बस अमरावतीरून परतवाड्यात सकाळी पोहचली आणि लागलीच उपलब्ध प्रवाशी घेऊन परतली. नागपूर डेपोची इंदोर-नागपूर बसफेरी सकाळी १०.१५ वाजताच्या दरम्यान दाखल झाली. याबसमध्येही मोजकेच चार-दोन प्रवासी बघायला मिळाले.
जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अन्य कुठल्या डेपोच्या बस परतवाडा बसस्थानकावर आल्या नाहीत. यात आठ दिवसांकरिता आपल्या गावी जाऊ इच्छीनारे लोकमात्र परतवाड्यात अडकलेत. यात मागच्या लॉकडाऊनची आठवण अनेकांनी बसस्थानकावरच काढली.