अमरावती : कॅशबॅक लागल्याची बतावणी करून एका तरुणाला तब्बल १ लाख २ हजार ७०० रुपयांनी ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ५ ते ६ ऑगस्ट रोजी नांदगाव पेठ येथे ही घटना घडली. कॅशबॅक मिळालीच नाही, उलट एक लाखांचा चुना लागला, ही त्याची कैफियत अत्यंत बोलकी होती. २५ लाखांची लॉटरी लागली, १० लाखांचे रिवार्ड घोषित झाले, लकी ड्राॅमध्ये दुचाकी, चारचाकी लागली, अशा भूलथापा देऊन ऑनलाईन गंडा घालण्याच्या प्रकारात अलीकडे मोठी वाढ झाली आहे. त्यात कॅशबॅकचे आमिष दाखवून मोाबईलधारकांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत.
नांदगाव पेठच्या पंकज भस्मे (३१) या तरुणाबाबत असाच प्रकार घडला. ५ ऑगस्ट रोजी फोन पे कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करणारा काॅल त्याला आला. फोन पेकडून कॅशबॅक मिळाल्याची बतावणी करण्यात आली. कॅशबॅक मिळविण्यासाठी मोबाईलवरील फोन पे ॲपवर प्रोसेस करण्यास बजावले. पंकज भस्मे यांनी त्या मोबाईलधारकाने सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूण केल्यानंतर कॅशबॅक तर मिळालीच नाही, उलट फोन पेशी संलग्न असलेल्या बँक खात्यातून १ लाख २ हजार ७०० रुपये कपात झाले. कपात झाल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी २३ ऑगस्ट रोजी दुपारी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.