अमरावती : राज्य सरकारने पोलीस भरती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रक्रिया आरंभली असून, १५ डिसेंबरपर्यत उदेवारांना अर्ज सादर करता येणार आहे. मात्र, या पोलीस भरतीत कारागृह रक्षकांची पदभरती होणार नसल्याने ३५० पदांचा बॅकलॉग जैसे थे राहणार आहे. कारागृह रक्षक पदांची डिमांड शासनाकडे करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरतीत कारागृह रक्षक पदांच्या भरतीबाबत नोंद नसल्याची माहिती आहे.
राज्याच्या कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलीस महासंचालक हे पद प्रभारी आहे. कारागृह प्रशासनात पोलीस उपमहानिरीक्षक ३, उपविभागीय पोलीस अधीक्षक १३, तुरूंगाधिकारी १०० पदे, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक ७ तर, कारागृह रक्षकांची ३५० पदे रिक्त आहेत. राज्य शासन प्रत्येक वेळी पोलीस भरतीसाेबत कारागृह रक्षकांची पद करीत असते. मात्र, कारागृह प्रशासनाकडून रक्षकांच्या पदांसंदर्भात मागणी न आल्याने ही पद भरती होऊ शकत नाही. गत काही वर्षांपासून कारागृह प्रशासनात अनेक पदे रिक्त असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बंदीजनांची संख्या असल्याने अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बंदीजनांच्या मानवाधिकारावरही गदा येत असल्याबाबतची याचिका गत दोन वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने राज्य शासनाला रिक्त पदांची भरती करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. तरिही कारागृह प्रशासनाचा कारभार ‘आंधळं दडतेयं अन् कुत्र पीठ खातेयं’ असा सुरू आहे. राज्यात कैदी क्षमता २४७२२ तर बंदिस्त कैदी ४२८६० असून अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण ५०६८ रिक्त पदे आहेत.एडीजींनी प्रस्ताव पाठविला नाही
राज्य सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतल्यानंतर कारागृहात रक्षकांची ३५० पदे रिक्त आहे. तरिही कारागृह रक्षक पद भरतीसंदर्भात प्रभारी अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी प्रस्ताव पाठविला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस भरतीसोबत कारागृह रक्षक पदभती होणार नाही, अशी माहिती आहे. कारागृह प्रशासनात वरिष्ठांचा कारभार सुद्धा प्रभारी असल्याने सावळागोंधळ सुरू आहे.
कारागृह रक्षकांच्या रिक्त पदांबाबत अगोदर मुख्यालयातून शासनाकडे माहिती पाठविण्यात आली नव्हती. मात्र, ही बाब लक्षात येताच कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयातृून रक्षकांच्या पदभरतीबाबत पत्र पाठविले आहे, त्यामुळे पोलीस भरतीसोबत कारागृह रक्षक भरतीची जाहिरात निघेल.
- स्वाती साठे, डीआयजी, कारागृह विभाग. पुणे