अमरावती : कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास सुरुवात केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीतील बालकांचा शोधमोहिम राबवली जाणार आहे. यात आढळलेल्या सॅम आणि मॅम बालकांवर योग्य उपचार करण्यात येणार आहेत. सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र हा नारा दिल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कुपोषणमुक्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
ना. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेवकांचा समावेश असणार आहे.
० ते ६ वर्ष वयोगटातील बालक, गरोदर महिला आणि स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणी, लसीकरण पूर्ण करण्याचंही उद्दिष्ट या पथकांना देण्यात आलेले आहे. या मोहिमेद्वारे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात विभागाला यश येईल, असा विश्वास ना. ठाकूर यांनी व्यक्त केला. या तपासणीत सॅम आणि मॅम श्रेणीत आढळणाऱ्या बालकांना बाल ग्रामविकास केंद्रांत दाखल करावे, तसेच त्यांना ई.डी.एन.एफ पुरवठा तातडीने करावा, अशा सूचना महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.