अमरावती : जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने शंकरनगर हिंदू स्मशानभूमीत स्थानिक आमदारांद्वारे कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यसंस्कार तसेच विद्युत शवदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिसरातील सर्व नागरी कृती समित्यांनी तीव्र निषेध केला आहे. कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनी उभारल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,
असा इशारा माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी केला आहे.
शंकरनगर येथील हिंदू स्मशानमध्ये आधीपासूनच कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात विदर्भातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यांचे उपचार व ड्रेसिंगमुळे आधीच पसरत असलेल्या जंतूंपासून आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे राजापेठ उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे सहा वर्षांपासून निर्माणकार्य सुरू आहे. त्यामुळे महापालिका व लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिक त्रस्त आहेत. सोबतच या भागातील उद्योग, छोटा-मोठा व्यापार संपला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत येथील शंकरनगर स्मशानात कोरोना संक्रमित असलेले मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णयामुळे हा संपूर्ण परिसर कोरोनाग्रस्त होऊ शकतो. सोबतच कोरोना मृतदेह ये-जा करणाऱ्या शववाहिकांमुळे राजापेठ, नंदा मार्केट, गोविंद नगर, केडियानगर, कंवरनगर, शंकरनगर, जयरामनगर, प्रमोद कॉलनी, एकनाथपुरम्, एकनाथ विहार, सुशीलनगर झोपडपट्टी, शिवछाया कॉलनी, बालाजीनगर या संपूर्ण भागामधून कोरोना मृतदेहांच्या शववाहिका येण्या-जाण्याचे प्रमाण वाढेल व संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन कोरोना प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता स्थानिक आमदार व जिल्हा प्रशासनाने तातडीने हा निर्णय रद्द करावा व कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार शहराच्या बाहेरील भागात करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे नागरी कृती समितीचे मुन्ना राठाेड यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.