फोटो - आमदार १८ पी
परतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आरोग्य यंत्रणेविरुद्ध आदिवासींमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागील सहा महिन्यांपासून धारणी तालुक्याच्या दिदम्दा येथे डॉक्टर बेपत्ता आहे, तर अनेक उपकेंद्रांमध्ये आरोग्य कर्मचारी बेपत्ता असल्याचा प्रकार मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांनी दिलेल्या भेटीत आला. दुसरीकडे अनेक ठिकाणी ताप, डेंग्यूसारख्या आजाराने आदिवासी आजारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धारणी व चिखलदरा तालुक्यातील मांगीया, दिदम्दा, कारा, कोट, चिखली आदी गावांतील आरोग्यस्थितीचे केवलराम काळे यांनी निरीक्षण केले. आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा अनेक ठिकाणी पुढे आला आहे. साथीच्या आजाराने अनेक आदिवासी आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार करणारी आरोग्य यंत्रणाच बेपत्ता असल्याचा आरोप त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
बॉक्स
चिखली येथे युवकाचा मृत्यू
धारणी तालुक्यातील दिदम्दा या गावात सहा महिन्यांपासून डॉक्टर यादगिरे गैरहजर असल्याचा प्रकार केवलराम काळे यांच्या भेटीदरम्यान उघडकीस आला. नांदुरी, चौराकुंड, बेरदाबल्डा आदी इतर ठिकाणी परिचारिकांची नियुक्तीच केलेली नाही. चिखली येथे डेंग्यूमुळे मनीष मेटकर या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. आरोग्य यंत्रणा आदिवासींच्या जिवावर उठण्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
---------------
मेळघाटातील अनेक गावांमध्ये साथ रुग्णाचा आजार पसरला असताना आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे खिळखिळी झाली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे. तशी माहिती संबंधितांना कळविण्यात आली आहे. दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
- केवलराम काळे, माजी आमदार, मेळघाट