कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याकरिता अनलॉकमध्ये एसटी बसेस सुरू होताच कुठल्याच प्रवाशांना विनामास्क बसमध्ये एंट्री देऊ नये, असा निर्णय विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी घेतला. त्यासंदर्भाच्या सूचना त्यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना दिल्या. मात्र, सोमवारी अमरावती मध्यवर्ती आगारात यासंदर्भात रियालिटी चेक केली असता, अनेक प्रवासी विनामास्कसमध्ये चढताना आढळून आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी या निर्णयाचा खऱ्या अर्थाने फज्जा उडाला आहे, मग कोरोना कसा रोखणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘लोकमत’ने सोमवारी दुपारी यासंदर्भात मध्यवर्ती आगारात रियालिटी चेक केली. एसटी महामंडळाने अमरावती जिल्ह्याकरिता ७८ बसेस सुरू केल्या आहेत. काही बसफैऱ्या इतर जिल्ह्यातूनसुद्धा अमरावतीत आल्या. मात्र, बसमध्ये मास्कशिवाय प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असे विभाग नियंत्रक म्हणाले. मात्र, त्यांनी यासंदर्भात आगारातून कुठलीच उपाययोजना केली नाही. पथक किंवा कर्मचारी नेमले नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी मास्क घालून नियमांचे पालन केले. अनेक प्रवाशांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बसमध्ये प्रवास केला. त्यामुळे विभाग नियंत्रक कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
सॅनिटायझरचा वापर केव्हा?
अनलॉक जरी झाले असले तरी कोरोना थांबविण्यासाठी गर्दी टाळणे, फिजिकल डिस्टंसिंग, मास्क घालणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. शासनाच्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. मात्र, अमरावती मध्यवर्ती आगारात सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याची बाब समोर आली. काही प्रवाशांनी स्वत:चे सॅनिटायझर वापरले. मात्र, बसमध्ये चढताना मास्क असल्याशिवाय एंट्री देऊ नये, तसेच एसटी महामंडळाच्यावतीने प्रवाशांच्या हातावर सॅनिटायझर द्यावे, अशी मागणी काही प्रवाशांनी केली.
कोट
आगाराच्या ध्वनीक्षेपकाद्वारे प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात येत आहे. नागरिकांना विनंती वजा हटकण्यासाठी चौघांचे पथकही नेमण्यात आले आहे. मास्कशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, याकरिता चालक-वाहकांनाही सूचना दिलेल्या आहेत. प्रवाशांनीही सहकार्य करावे.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक, एसटी अमरावती