अमरावती : नागपूरप्रमाणे आता अमरावतीमधीलही आठ मंदिरांनी भक्तासाठी मंदिर प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तोकडे किंवा अंगप्रदर्शन करणारी किंवा उत्तेजक कपडे परिधान केलेल्या भक्तांना आता दर्शन घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाच मंदिर महासंघाने मंगळवारी महाकाली माता मंदिर शक्तीपीठ येथे पत्रकार परिषदेतून मांडली.
मंदिराचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार तसेच संस्कृती जपण्यासाठी मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील ठराव फेब्रुवारी महिन्यात जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत घेण्यात आला होता. अमरावती येथे झालेल्या प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनामध्येही याविषयी चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. ज्याप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू आहे, शाळा, महाविद्यालय, न्यायालयात वस्त्रसंहिता लागू आहे, तर मग मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाल्यावरच त्याला विरोध का? असा प्रश्नही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.
दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील जवळपास २५ मंदिरांमध्ये हा निर्णय लागू होणार असून, सध्या आठ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रशासन किंवा राजकीय दबावातून हा निर्णय कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे होणार नसल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी महाकाली माता मंदिर पीठाधीश्वर शक्ती महाराज, राजेंद्र पांडे, नितीन व्यास, श्रीकांत पिसोळकर, विनीत पाखोडे, अनुप जयस्वाल, मीना पाठक, राजेश हेडा, जयेश हेडा उपस्थित होते.
या मंदिरात वस्त्रसंहिता लागू
जिल्ह्याची ओळख असलेल्या अंबादेवी संस्थानसह बालाजी मंदिर जयस्तंभ चौक, पिंगळादेवी देवस्थान नेर पिंगळाई, संतोषी माता मंदिर, आशा मनीषा देवी संस्थान दर्यापूर, श्री लक्ष्मी-नारायण देवस्थान देवळी, शैतुतबाग हनुमान मंदिर परतवाडा, दुर्गामाता मंदिर वैष्णोधाम तसेच महाकाली माता मंदिर या ठिकाणी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. याठिकाणी तोकडे कपडे घालून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना बाहेरच थांबवून त्यांना महिला असेल तर ओढणी व पुरुष असेल तर लुंगी परिधान केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश मिळेल.