अमरावती: रंगपंचमीला अर्थात २५ मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी तीनवाजेपर्यंत शहरातील तीनही उड्डाणपूल वाहतुकीस बंद राहिल. पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.
होळी, धुलीवंदन नागरिक हर्षोउल्हासात साजरा करतात. या उत्सवादरम्यान काही नागरिक बियर बार, धाबे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन करुन ट्रिपलसिट तथा भरधाव वेगाने वाहन चालवितात. अशा परिस्थितीत वाहन चालवितांना वाहन चालकांचे संतुलन राहत नाही. त्यामुळे बरेचदा अपघातासारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये करीता जनसामान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुलिवंदनाच्या दिवशी खबरदारीची उपाययोजना म्हणून २५ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन व कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहिल. पोलीस उपायुक्तांनी त्याबाबत शुक्रवारी अधिसुचना पारित केली.
उड्डाणपूल प्रवेशबंदीच्या अधिसूचनेचे जो कोणी वाहनचालक उल्लंघन करेल, त्यांच्याविरुध्द मोटर वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. २५ मार्च रोजी शहरातील तीनही उड्डाणपूल वाहतुकीस बंद राहिल. - कल्पना बारवकर, पोलीस उपायुक्त