लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये जनसंवाद विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालये आहेत. मात्र, जनसंवाद विषयात पीएच.डी. करायचे असल्यास विद्यार्थ्यांना गाइड उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जनसंवाद विषयाची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांना पीएच.डी.पासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढवला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार आॅनलाइन पीएच.डी. प्रवेशाची २० मार्च ही अंतिम तारीख आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करण्याची इच्छा असते. नेट-सेट, पेट, पॅट परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे पीएच.डी. पदवी मिळवितात. परंतु, नेट-सेट, पेट, पॅट अशा विविध परीक्षा उत्तीर्ण होऊनही जनसंवाद (मास कम्युनिकेशन) या विषयासाठी संपूर्ण विदर्भात एकही संशोधन केंद्र निर्माण करण्यात आले नाही तसेच गाईड देखील उपलब्ध नसल्याने जनसंवाद पदव्युत्तर पदवी प्राप्त करूनही पीएच.डी. करता येत नसल्याचे शल्य अनेक विद्यार्थ्यांना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून जनसंवादाची पदव्युत्तर पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. गाइड होण्यासाठी अन्य विद्यापीठातील गाइड तयार होत नाहीत. हा महत्त्वाचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. असे असताना व्यवस्थापन परिषद, सिनेट अथवा विविध प्राधिकारिणींनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. बहुतांश विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांना जनसंवाद पदव्युत्तर विषयात गाइड व संशोधन केंद्राअभावी पीएच.डी. करता येत नाही.नव्या विद्यापीठ कायद्यानुसार ४०० गाइडची यादी प्रसिद्ध केली. ही संख्या वाढण्याचे संकेत आहेत. संशोधन केंद्राची घोषणादेखील झाली आहे. जनसंवाद पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पीएच.डी. गाइड नोंदणीची प्रक्रिया केली जाईल.- सुजय बंड, पीएच.डी. सेल प्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
विदर्भात जनसंवाद विषयासाठी पीएच.डी. गाइड मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:43 AM
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये जनसंवाद विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालये आहेत. मात्र, जनसंवाद विषयात पीएच.डी. करायचे असल्यास विद्यार्थ्यांना गाइड उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देनागपूर, अमरावती विद्यापीठापुढे पेच संशोधन केंद्रावर आॅनलाइन पीएचडी प्रवेशाची आज अंतिम तारीख