अमरावती : गत वर्षापासून कोरोना विषाणूने कहरच केला असून, अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. मृत झाल्यानंतर मृतदेहाचे थेट आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून दहन केले जात आहे. त्यामुळे खांदेकरी नाही अन्य विधीही नाही..! फोटो पूजन, १२ दिवस आधीच धार्मिक विधी उरकण्याचा प्रसंग नातेवाईकांवर ओढावला जात आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १,१९५ जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळणे, व्हेंटिलेटरची कमतरता, रेमोसिविर इंजेक्शनची वानवा आदी कारणांनी रुग्ण मृत पावत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे चालते - बोलते रुग्णही तडफडून मृत पावत आहेत. कोरोना विषाणूचा आजारच भयंकर आहे. या आराजाने मृत झालेल्यांचा मृतदेह १ ते २ नातेवाईकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळत प्रशासनातर्फे दहन केले जात आहे. त्यामुळे खांदेकरी, तिसरा दिवस, बारावा दिवस असे कोणतेही धार्मिक विधीविना सोपस्कार पार पाडले जात आहेत. कावळ्याने नैवेद्य शिवण्याचा विषय तर लांबच राहिला आहे. जन्मदात्या आई-वडिलांचे दर्शनही कोरोनामुळे दुर्लभ झाले आहे. नातीगोतीही दुरावत आहेत. अनेक नवे संसार उभे राहण्याआधीच कोलमडले आहे. सुखाने नांदणारे संसार कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. कित्येक कुटुंबांचे आधारच कोरोनाने हिरावले आहेत. नात्यातील गोतावळा भीतीमुळे घुटमळला गेला आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी तर दूरच मृतदेहांवर अंतिम संस्काराला जाता येत नाही, हे दुर्दैव आहे. दु:खद समयी आधार देणारी नाती, मित्रमंडळी मात्र नाइलाजाने दूरच राहत आहेत. त्यामुळे आता कोरोना पासून बचाव करणे इतकेच आपल्या हाती राहिले आहे. कोरोनाने बरेच काही शिकवले त्यामुळे हाकेला ओ देणारी नातीगोती मात्र दुरावल्याचे कौटुंबिक दुर्दैव आहे.