मोझरी : महिलांचे महावितरणमध्ये आंदोलन
तिवसा : आमच्याकडे वीजबिल भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आता आमच्या गळ्यातील मंगळसूत्र घ्या. ते गहाण ठेवा. त्या पैशातून वीजबिल भरा, अशी मागणी मोझरी येथील महिलांनी तिवसा वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता राजेश पाटील यांच्याकडे केली. शुक्रवारी संतप्त महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात मंगळसूत्र घेऊन आंदोलन केले.
५० टक्के वीज बिल माफीचे दिलेले आश्वासन फोल ठरल्यानंतर महावितरण कंपनीद्वारे थकीत वीज बिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मोझरीत मागासवर्गीय वस्तीत वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी धमक्या देत असून ते बिलात टप्पे पाडून देत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून चक्क उपविभागीय अभियंता राजेश पाटील यांच्या टेबलावर ठेवत हे मंगळसूत्र तुम्ही घ्या व सोनाराकडे गहान ठेवा, असे महिलांनी सांगितले. यावेळी युवा संघर्ष संघटनेचे अध्यक्ष जसबिर ठाकूर, मोझरीचे उपसरपंच निखिल प्रधान, बेबी चांदणे, ललिता चांदणे, ललिता वानखडे, संगीता डोंगरे सह महिला उपस्थित होत्या.
पान ३ साठी