अमरावती: संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठ संलग्नित एकूण ४०५ महाविद्यालये आहेत. मात्र, अद्यापही २२६ महाविद्यालयांनी ईन्स्टिट्यूशनल ईन्फॉर्मेशन फॉर क्वॉलिटी असेसमेंट (आयआयक्यूए) अहवाल ‘नॅक’कडे सादर केला नाही. यात विनाअनुदानित २०८ तर १८ अनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे. सात लाखांचे नोंदणी शुल्क असल्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांचे संस्था चालक ‘नॅक’कडे पाठ फिरवित असल्याचे वास्तव आहे.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या गाईडलाईननुसार अनुदानित अथवा विनाअनुदानित महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मानांकन करणे अनिवार्य आहे. मात्र, आतापर्यत विद्यापीठ संलग्नित १४३ अनुदानित महाविद्यालयांचे ‘नॅक’ झाले असून १८ महाविद्यालये ‘नॅक’पासून वंचित आहेत. तसेच २३८ विनाअनुदानित पैकी २०८ महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन केले नाही, अशी माहिती आहे.
नोव्हेंबर २०२३ पर्यंत एकूण १८६ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले असून, आतापर्यंत २२५ महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकनासाठी अर्ज सादर केला नाही. दर पाच वर्षांनी महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन करणे नियमावली आहे. मात्र, संस्था चालकांकडून ‘नॅक’मूल्यांकनासाठी साठी ढकलगाडी असा प्रवास सुरू असल्याचे चित्र आहे.
१४३ अनुदानित महाविद्यालयांचे ईन्स्टिट्यूशनल ईन्फॉर्मेशन फॉर क्वॉलिटी असेसमेंट अहवाल प्राप्त झाले आहेत. तर २०८ विनाअनुदानित महाविद्यालयांनी ‘नॅक’ प्रक्रिया केली नाही. शासन निर्देशानुसार संबंधित संस्था चालकांना अवगत केले आहे. परिस्पर्श योजनेतून ‘नॅक’ न झालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठ आणि शासनाकडून अनुदान मिळते, याचा लाभ संस्था चालकांनी घ्यावा.- डॉ. संदीप वाघुळे, संचालक, आयक्यूसी विभाग, अमरावती विद्यापीठ.