अमरावती : शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता पीक कर्ज जिल्ह्यातील सर्व बँकांनी जादा कागदपत्रांची मागणी न करता, सुलभरीत्या उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज वाटपाबाबत सोमवारी आयोजित बैठकीत आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, लीड बँक मॅनेजर एल.के. झा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, व्यावसायिक व सहकारी बँकांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सर्व बँकांनी सहकार्य करावे. जादा कागदपत्रांची मागणी करून नाहक त्रास देऊ नये. शेतकऱ्यांकडून नो-ड्यूजचे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घ्यावे. सीएससी सेंटर, सेतु सुविधा केंद्र किंवा आपले सेवा केंद्र, महाभूमी पोर्टल येथून काढलेली डिजिटल सहीची शेतीचा सात-बारा, आठ-अ ही कागदपत्रे मान्य करावी. पीक कर्जासाठी सात-बारावर तलाठ्याच्या सही-शिक्क्याची मागणी करू नये. ग्रामस्तरीय कोरोना समिती किंवा ग्रामस्तरीय कृती समित्यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज गोळा करून बँकेचे व्यवसाय प्रतिनिधी किंवा बँक प्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून गरजूंच्या पीक कर्ज प्रकरणांचा निपटारा करावा. बँक व्यवस्थापकांनी संबंधित गावांमध्ये पीक कर्ज प्रकरणांबाबत ग्रामस्तरीय कोरोना समिती किंवा ग्रामस्तरीय कृषी समिती यांच्याशी समन्वय साधून योग्य कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बॉक्स
ही कागदपत्रे अनिवार्य
नवीन पीक कर्जाकरिता आधार कार्ड, सात-बारा उतारा, आठ अ, फेरफार, दोन फोटो, जमिनीच्या नकाशासंदर्भात तलाठ्यांनी दिलेला हात नकाशा किंवा जमिनीच्या हद्दी नमूद असलेला उतारा आदी कागदपत्रे स्वीकारण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.