अमरावती : अमरावती लोकसभेची निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतसारखी लढायची आहे. १२ वाजेपर्यंत सर्व मतदान आपल्याला बूथवर न्यायचे आणि सर्वांनी मतदान केले पाहिजे. मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये, एवढी मोठी यंत्रणा असून २०१९ मध्ये एक अपक्ष खासदार निवडून आली होती आणि आपला झेंडा रोवून गेली होती, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केल्याने भाजपजनांची बोलतीच बंद झाली आहे.
अचलपूर येथे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या रविवारी प्रचारसभेत बोलत होत्या. दरम्यान, राणांनी भाजप पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना जर फुग्यात राहात असाल देशात मोदींची हवा आहे, तर हे लक्षात ठेवा २०१९ मध्ये अपक्ष खासदार निवडून आली होती.
भाजपची एवढी मोठी यंत्रणा असताना या जिल्ह्यात एक अपक्ष खासदार निवडून आला, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी अचलपूर येथील बंद असलेल्या फिनले मिलच्या समस्येवर प्रकाश टाकला.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावल्याने त्या चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. मात्र, आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. त्या भाजपच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप देशभर मोदींच्या नावाने मते मागत असून, देशभरात मोदींची हवा असल्याचे सांगत आहे. मात्र, मोदींची हवा असल्याच्या मुद्द्याला नवनीत राणा यांनी छेद दिला आहे, हे विशेष.एडिट करून बातमी मीडियात प्रसारित : नवनीत राणा
यंदा लोकसभा निवडणुकीत देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच मते मागितली जात आहेत. अमरावतीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचून मोदींचा नमस्कार, संदेश आणि विकासकामांची माहिती देत आहेत. देशात मोदींची हवा आहे, होती आणि पुढेही राहील. पुन्हा मोदी हेच पंतप्रधान होतील. नवरा-बायकोच्या मधात बाहेरच्यांनी बोलू नये, हे वाक्य मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत बाेलले नव्हते, तर अचलपूरचे आमदार यांना उद्देशून बाेलले, असे खासदार नवनीत राणा यांनी एक व्हिडीओ जारी करून स्पष्टीकरण केले आहे. विरोधकांनी असे गलिच्छ राजकारण करू नये, असा सल्लादेखील त्यांनी दिला.