दर्यापूर : मतदार यादीत मतदाराचे छायाचित्र नसेल, तर यादीतून नाव वगळण्यात येणार असल्याचे तहसीलदार योगेश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. अशा मतदारांनी २६ फेब्रुवारीपर्यंत छायाचित्रामागे नाव लिहून यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक लिहून तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात जमा करायचा आहे.
दर्यापूर तालुक्यामध्ये सचित्र मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम झाला आहे. ४०-दर्यापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत दर्यापूर तालुक्यात एकूण २०२ यादी भाग आहेत. यादी भागनिहाय एकूण १७३८ मतदारांचे मतदान केंद्रांच्या यादीत छायाचित्र नाही. त्यापैकी १७४ मतदारांची छायाचित्रे प्राप्त झाली असून, उर्वरित १५६५ मतदारांची छायाचित्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत वारंवार गृहभेटीदरम्यान सदर छायाचित्र नसलेले मतदार नमूद पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचे समोर आले आहेत. अशी नावे कटाक्षाने वगळली जाईल, अशीही माहिती देण्यात आली आहे. मतदानाचे कर्तव्य पुढेही सहजतेने करता यावे, यासाठी मतदारांनी मतदार यादीत छायाचित्र आहे किंवा नाही, याची खात्री करून बीएलओ अथवा तहसील कार्यालयात जाऊन करावी व २६ फेब्रुवारीपर्यंत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात छायाचित्र उपलब्ध करावे, असे आवाहन नायब तहसीलदार (निवडणूक) कृष्णा गाडेकर व अव्वल कारकून वर्षा नवलकार यांनी केले आहे.