लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युती सरकारच्या काळात चार वर्षांत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठले आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे जून उजाडला असताना वृक्ष लागवडीबाबत जिल्हास्तरावर ना नियोजन, ना बैठकी, असे चित्र आहे. त्यामुळे वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार की नाही, यासंदर्भात संभ्रम आहे.वनमंत्री संजय राठोड यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नावाने वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात २६ लाख वृक्ष लागवड जून महिन्यात करण्याचे नियोजन होते. फेबु्रवारीमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वन विभागासह अन्य यंत्रणांची बैठक घेऊन यावर्षीचे वृक्षलागवडीचे 'टार्गेट' निश्चित केले होते. परंतु, २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर आजपर्यंत वृक्षलागवडीबाबत ना नियोजन, ना बैठकी असा जिल्हा प्रशासनाचा कारभार सुरू आहे. ४ मे २०२० रोजी शासनाने नवीन योजना, उपक्रम, विविध कार्यक्रमांच्या निधीवर कात्री लावली आहे. दुसरीकडे वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार असल्याने वनविभागाच्या नर्सरीत १६ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.रोपांचे संगोपन, निगा राखणे, देखभाल करण्याकरिता मोठी रक्कम खर्च होत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात गतवर्षी १ कोटी ११ लाख वृक्षलागवडीचे 'टार्गेट' होते. किंबहुना १ कोटी १२ लाख वृक्षलागवडीची किमया प्रशासकीय यंत्रणांनी केली होती. यंदा वृक्ष लागवडीसाठी निधीची तरतूद नसल्याने वनविभागाचे अधिकारी ठोस निर्णय घेऊ शकले नाहीत. वृक्षलागवडीबाबत वनविभागाला शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.जिल्हा परिषदेत ‘नरेगा’तून वृक्षलागवडजिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षी नरेगा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. नरेगा अंतर्गत वृक्षलागवडीद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्हा परिषद त्यांच्या खुल्या जागा, इमारत परिसर, शाळा आदी महत्त्वाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने १६ लाख रोपे तयार आहेत. मात्र, यंदा वृक्ष लागवड कधीपासून होणार, याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. वन विभाग ‘कॅम्पा’ योजनेतून वृक्ष लागवड करणार आहे.- गजेंद्र नरवणे,उपवनसंरक्षक, अमरावती.