(असायमेंट)
अमरावती : हल्ली सण, उत्सवाचे दिवस असल्याने रेल्वे गाड्या फुल्ल धावत आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत ‘नो रूम’ आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे. विशेषत: पुणे, मुंबई मार्गे सर्वच रेल्वे गाड्यात चिक्कार गर्दी असून, आरक्षणाविना ‘नो एन्ट्री’मुळे प्रवाशांची त्रेधातिरपीट उडत आहे. पुढे दिवाळी उत्सवातही रेल्वेमध्ये हीच स्थिती असेल, असे संकेत आहेत.
------------------
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना!
- मुंबई, पुणे येथे नोकरी, व्यवसायानिमित्त असलेल्यांना आता गौरी, गणपती उत्सवासाठी घर गाठायचे आहे. तथापि, रेल्वे फुल्लचा फटका बसत आहे.
- रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्यामुळे ट्रॅव्हल्स संचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी चालविली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई येथून विदर्भात परतणाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
- रेल्वेचा प्रवास सुरक्षित असल्याने अन्य वाहनांनी मुंबई, पुणे येथून प्रवास नाही, अशी अनेकांची धारणा आहे. परिणामी रेल्वेचे आरक्षण नसल्याने अनेकांनी घरी येणे टाळले आहे.
----------------------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
नागपूर-पुणे गरीब रथ
हावडा-मुंबई गितांजली मेल
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
-------------------
हैद्राबाद मार्गावर गर्दी कमीच
पुणे, मुंबई मार्गावर रेल्वे फुल्ल असताना हैद्राबाद, तिरूपती मार्गे रेल्वेत गर्दी नगण्य आहे. कोरोनामुळे मंदिरे बंद असल्यामुळे तिरूपती देवस्थानात ये-जा करण्याऱ्या भक्तांची गर्दी ओसरली आहे. परिणामी अहमदाबाद-चेन्नै एक्स्प्रेस, अमरावती-तिरूपती एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी कमीच आहे.
-----------------
ना मास्क, ना शारीरिक अंतर
१) गणेशोत्सवात रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढल्याने बहुुतांश प्रवाशी मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. फलाटावर रेटारेटी ही अलीकडे नित्याचीच बाब झाली आहे.
२) कोरोनाची तिसरी लाट सीमेवर असताना रेल्वे फलाटावर, बोगीत नागरिक सैराट झाल्यासारखे वागत आहेत. ना मास्क, ना शारीरिक अंतर यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती आहे.
३) रेल्वेत गर्दी वाढली. कोरोना संपला अशा अविर्भावात नागरिक वागत आहेत. सण, उत्सवात कोरोनाचा उद्रेक झाला, तर नियमावलींना बगल दिली, हेच कारण पुढे येईल.
४) रेल्वेत खाद्यपदार्थही उघड्यावर विकले जात आहेत. रेल्वे प्रशासन, पोलिसांकडून कोरोना नियमावलीचे पालन होण्यासाठी कठोर पावले उचलली जात नाही.