नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) :मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही विकासाचा प्रकाश पोहोचला नसल्याचे वास्तव आहे. चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांची व्यथा प्रशासनालाही लाजीरवाणी ठरली आहे.
मेळघाटमधील अतिदुर्गम व जिल्ह्यातील कायम दुर्लक्षित भाग म्हणून गणला गेलेला एकताई परिसर विकासापासून कोसोदूर आहे. परिसरातील खुटिदा, सलिता, सुमिता, एकताई, भांडुम, बोरधा, टेम्बरू, पिपल्या, हिल्डा आदी गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. यापैकी अनेक गावांमध्ये डांबरी रस्ते, त्यावर पूल नाहीत.
आरोग्य सुविधेसाठी ग्राऊंड झिरोवर नियोजन हवे
एकताई परिसरातील नऊ गावे हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न आहेत. भौगोलिकदृष्ट्या हतरू पीएससीपासून या गावाचे अंतर सहा ते दहा किमीच्या आत आहे. मात्र, रस्तेच नसल्याने हतरू आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी रुग्णांना राहू-कारंजखेडा-हतरू असा २५ ते ३० किमी असा उलट प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे.
होमिओपॅथिक दवाखाना बंदच
एकताई येथे आरोग्य विभागाने होमिओपॅथिक दवाखान्याची नवीन प्रशस्त इमारत बांधली. पण, मनुष्यबळ व सुविधा पुरविल्या नाहीत. आजपर्यंत आदिवासी रुग्णांसाठी हा दवाखाना बंद आहे.
पूल बांधण्यासाठी आठ कोटींची गरज
खुटिदा गावासाठी एकताई येथून प्रस्तावित पूल बांधण्यासाठी जवळपास आठ कोटी खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्तावसुद्धा तयार केला. मोठा निधी उपलब्ध होणे कठीण असल्याने उपविभागाच्या अभियंत्यांनी प्रस्तावात बदल करून खर्च निम्मा केला तरी निधी मिळाला नसल्याची खंत आहे.
तत्कालीन पालकमंत्र्यांचे लक्ष
तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटकडे सर्वाधिक लक्ष दिले. कोट्यवधीचा निधी दिला. विशेषतः अतिदुर्गम हतरू व जारिदा परिसराच्या ४२ गावांची विद्युत व्यवस्था ३३ केव्हीमध्ये रूपांतरित करण्यासह पुलासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात खर्चात कपात सुरू असल्याने पुलाचे काम रखडले. आता शिंदे सरकारने त्यावर लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एकताई परिसरातील नऊ गावांचा आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने एकताई येथे आरोग्य केंद्र द्यावे. आरोग्य विभागाच्या निकषात बसत नसली तरी या इमारतीचा उपयोग व दुर्गम भाग असल्यामुळे मेळघाटकरिता ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी द्यावी
- पीयूष मालवीय, सदस्य, रुग्ण कल्याण समिती