अमरावती : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग चांगलाच वाढत आहे. मेळघाटसह वरूड आणि मोशी या तालुक्याची वाटचाल कोरोनाच्या हाॅटस्पॉट कडे वेगाने होताना दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे नियंत्रणासाठी मुख्यकार्यकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा परिषदे मार्फत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केले आहे. याची जबाबदारी झेडपीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) यांच्यावर सोपविण्यात आली असून, प्रत्येकी चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
नोडल अधिकारी नेमलेल्या मध्ये महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांच्याकडे चिखलदरा, धारणी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तुकाराम टेकाळे यांच्याकडे मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, नरेगाचे डेप्युटी सीईओ प्रवीण सिनारे यांच्याकडे तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे यांच्याकडे दर्यापूर, अमरावती, नांदगाव खंडेश्वर भातकुली याप्रमाणे तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून सीईओंनी नियुक्ती केली आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणे, विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी, रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांचे कॉन्टॅक्ट, ट्रेसिंग करून नमुना चाचणी घेणे, तपासणीचे अहवाल तातडीने पाठवून उपचारासाठी मदत करणे, कोविड रुग्णालयाची सेवा सुविधा, गुहविलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही हे पाहणे आदीबाबत जबाबदारी देण्यात आली आहे.
बॉक्स
वरूड, मोर्शी मेळघाटवर लक्ष
जिल्ह्यातील वरूड, मोर्शी यासह मेळघाटातील धारणी व चिखलदरा या भागात काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेशी वेळोवेळी संपर्क तसेच समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.