परतवाडा (अमरावती) : अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी पालक व विद्यार्थ्यांना हीन दर्जाची वागणूक, निकृष्ट जेवण, मेळघाटचे आ. राजकुमार पटेल यांची तक्रार, धारणी व पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाने मान्यता रद्द करण्याचा दिलेला प्रस्ताव पाहता आदिवासी विभागाने सोमवारी यवतमाळ येथील सनराइज इंग्रजी मीडियम स्कूल व अमरावतीच्या महर्षी शाळेचे ‘नामांकित’ प्रवेश रद्द केले आहेत. आदिवासी उपाययोजना नामांकित शाळा वगळता फी भरणारे विद्यार्थी मात्र शिक्षण घेऊ शकतील.
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्व शिक्षण मिळावे, यासाठी या शाळेतील हजारावर विद्यार्थ्यांचे राज्यभरातील इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. ‘लोकमत’नेही या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये मेळघाट मतदारसंघातील ८९९ विद्यार्थी निवासी वास्तव्यास होते. विद्यार्थ्यांना अपमानास्पद व दुजाभाव करणारी वागणूक, निकृष्ट जेवण, पालकांशी उद्धट वर्तन होत असल्याच्या तक्रारी होत्या. शाळा प्रशासनाविरुद्ध पालक व विद्यार्थ्यांनी संताप होता.
धारणीचे प्रकल्प अधिकारी सावंत कुमार व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही या संदर्भात भेटी देऊन पाहणी केली करून तशी तक्रार मंत्रालयात दिली होती. तसेच प्रकल्प कार्यालयाने शाळेतून आदिवासी विद्यार्थी काढून घेणे आणि ‘नामांकित’ प्रवेश रद्दचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर शासनाने अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलसह इतर तक्रारीवरून पांढरकवडा प्रकल्पांतर्गत यवतमाळ येथील सनराइज इंग्रजी स्कूलची ‘नामांकित’ प्रवेशाची मान्यता रद्द केली आहे. मात्र, आदिवासी उपाययोजना नामांकित शाळा वगळता, इतर शहरी भागातील पालक वार्षिक फी भरणारे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेऊ शकणार आहे.
प्रति विद्यार्थी ७० हजारांचा खर्च
आदिवासी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी नामांकित शाळांमध्ये शिक्षण या योजने अंतर्गत प्रति विद्यार्थी किमान ७० हजार रुपये वार्षिक खर्च शासनाकडून खासगी संस्थांच्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिला जातो. त्यानुसारच शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन व योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी होती. परंतु तक्रारी व चौकशी अहवाल पाहता आदिवासी विभागाने शाळेत ‘नामांकित’ प्रवेशाची मान्यता रद्द केली आहे.
महर्षीचे ८९९ विद्यार्थी इतर शाळेत
अमरावतीच्या महर्षी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत ८९९ विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत होते. शाळेतून प्रवेशाची मान्यता रद्द केल्याने हे विद्यार्थी राज्यातील इतर शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहेत.
विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी, चौकशी, अंतिमत: अनेक गंभीर बाबी पाहता शासनाला संबंधित शाळा मान्यता प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार महर्षी शाळेतून ‘नामांकित’ प्रवेशाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
सावन कुमार, प्रकल्प अधिकारी, धारणी