अमरावती - पश्चिम विदर्भात सलग चार वर्षे दुष्काळ व नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात असताना पीक कर्जवाटपासाठी बँकादेखील माघारी पाठवित असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाला दोन महिने झाले असतानाही पीक कर्जवाटपाचा टक्का २७ वरच रखडलेला आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने वारंवार तंबी दिल्यावरही बँका जुमानत नसल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा सवाल आहे. यंदाच्या खरिपासाठी विभागात ३२ लाख ३१ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पावसाने सुरुवातीपासून दडी मारल्याने किमान चार लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना पीककर्ज वाटपासाठी बँकांचा टक्का वाढलेला नाही. यंदाच्या हंगामात अमरावती विभागातील बँकांना खरिपासाठी ८५४९ कोटी ३२ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ३ लाख ५ हजार ९५० शेतकºयांना २ लाख ४० हजार ६८० हेक्टर क्षेत्रासाठी २३६० कोटी चार लाखांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. दर आठवड्यात एक टक्का वाटप अशी बँकांची गती राहिली आहे. शेतक-यांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी खरिपाच्या कर्जवाटपाचा आढावा घेतला. जिल्हाधिका-यांनी दर आठवड्यात कर्जवाटपाच्या आढावा सभा घेतल्या, मात्र, बँकांवर शासन-प्रशासनाच्या तंबीचा कोणताच परिणाम झालेला नाही, असे दिसून येते.विभागात जिल्हा सहकारी बँकांनी ४३ टक्के कर्जवाटप केल्यामुळे वाटपाची सरासरी वाढली आहे. जिल्हा बँकांना २३०५ कोटी ६९ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ९९१ कोटी ५३ लाखांचे कर्जवाटप केल्यामुळेच कर्जवाटपाची सरासरी वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११ कोटी तीन लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना आतापर्यत १२२५ कोटी ४७ लाखांचे वाटप झाले आहे. ही २२ टक्केवारी आहे, तर ग्रामीण बँकांना ८३२ कोटी ५८ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ११९ तीन लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही १४.३० टक्केवारी आहे. दर आठवड्याला एक टक्का अशी गती गृहीत धरल्यास यंदाच्या हंगामात कर्ज वाटपाचा ३५ टक्क्यांच्या आत राहणार, हे वास्तव आहे.
बँकांचे असहकार्य : पश्चिम विदर्भात खरिपाचे २७ टक्केच कर्जवाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 5:26 PM