किशोर मोकलकर लोकमत न्यूज नेटवर्कआसेगावपूर्णा : रहस्यमय आगीमुळे घरातील काही कपडे पेटत असल्याच्या पातालबन्सी कुटुंबीयांच्या दाव्याचे शनिवारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्यशोधन केले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ‘टीम अभाअंनिस’ने दाव्याची पडताळणी केली. सदर प्रकार हा मानवी हस्तक्षेपातून घडला आहे, असा निष्कर्ष अभाअंनिसने नोंदविला.‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची तातडीने दखल घेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे तसेच शेखर पाटील, हरीश केदार, राजू खिराडे, उल्का पाटील, कांचन दावेदार, सुनील पापडकर, ज्ञानेश्वर दाहेदार, संजय जिचकार, रवींद्र कोडे, प्रकाश कळसकर यांनी शनिवारी टाकरखेडा पूर्णा गाठून पातालबन्सी कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रकरणाच्या मुळाशी अभाअंनिसची चमू पोहोचली. आग लागण्याचे कारण शोधले गेले. घटनेमागे कुठलेही रहस्य वा भानामती नसून मानवी हस्तक्षेपामुळे आग लागत असल्याचा निष्कर्ष काढला. पडताळणीदरम्यान आसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, शिपाई सतीश प्रधान हे उपस्थित होते. अंधश्रद्धेतून घडणाऱ्या या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पाताबन्सी कुटुंबीयांचे प्रबोधनही अभाअंनिसच्या चमूने केले.
भानामती, अतिंद्रीय, दैवी, अमानवी वा अदृश्य शक्ती अस्तित्वात नाहीतच. पातालबन्सी यांच्या घरात अचानक आग लागण्याचा प्रकार कुठल्याही शक्तीशी संबंधित नसून, त्यामागे मनुष्य हस्तक्षेप आहे. सत्यशोधन यशस्वीपणे केले गेले. तथापि, समितीच्या धोरणानुसार संबंधितांचे नाव जाहीर करता येणार नाही. मात्र, हा प्रकार आता बंद होईल. - गणेश हलकारे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अभाअंनिस
पातालबंसी सदस्यांशी स्वतंत्र चर्चाअभाअंनिसने पातालबन्सी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची बंद दाराआड पडताळणी केली. सर्वांंची पडताळणी झाल्यानंतर सर्वांना एकत्र आणून पुन्हा आपल्या घरात असा प्रकार होणार नाही, असे समितीने कुटुंबीयांना आश्वासन दिले. कुटुंबीयांनीही दोन-तीन दिवसांपासून असला प्रकार होत नसल्याचे सांगितले.
विद्युत पुरवठा जोडलापातालबंसी कुटुंबाच्या घरात घडणाऱ्या आगीच्या मुळाशी शॉर्ट सर्किट असल्याच्या संशयामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तो आता पूर्ववत केला आहे.