अमरावती : येथील १९ वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण हे ‘लव्ह जिहाद’शी संबंधित असल्याचा सनसनाटी आरोप खा. नवनीत राणा व भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला होता. खा. राणा व राजापेठ पोलिसांमध्ये त्यावरून मोठी शाब्दिक चकमक देखील रंगली होते. मात्र, आपले कुणीही अपहरण केले नसून, आपण स्वत:हून काही वैयक्तिक कारणामुळे रागाच्या भरात घर सोडल्याची माहिती त्या तरुणीने दिली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ‘लव्ह जिहाद’चा आरोप तद्दन खोटा ठरला आहे. ती तरुणी साताऱ्यात सुखरूप सापडली आहे. राजापेठ पोलीस शुक्रवारी सकाळी तिला घेऊन अमरावतीत पोहोचतील.
आपल्या १९ वर्षीय मुलीला विशिष्ट धर्मिय मुलाने पळवून नेले आहे. तिला शोधा, अशी आर्जव एका महिलेने आपल्याकडे केली. त्याबाबत आपण राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याकडून माहिती घेत असताना त्या पोराला कडकपणाने विचारा असे म्हणताच ठाकरे यांनी आपला कॉल रेकार्ड केल्याचा आरोप राणा यांनी बुधवारी केला होता. माझा कॉल रेकार्ड करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल करत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. तेथे मोठा गोंधळ झाला. तर, दुसरीकडे शिवराय कुळकर्णी यांनी त्या मुलीच्या तातडीच्या शोधासाठी ठाण्याचा आवारात निदर्शने केली होती. मात्र संबंधित तरुणीने काही कारणांना कंटाळून रागाच्या भरात घर सोडून गेले असल्याचे सांगत त्या आरोपामधील हवा काढली आहे.
लव्ह जिहाद प्रकरण: ‘त्या’ तरुणीला साताऱ्यात घेतलं ताब्यात, पोलीस बंदोबस्तात अमरावतीकडे रवानासातारा रेल्वे स्थानकाहून घेतले ताब्यात
राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ वर्षीय युवती मंगळवारी दुपारनंतर बेपत्ता झाली. त्यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्याबाबत त्याच रात्री एका संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले. तर, बुधवारी ती तरुणी पुणे सातारा रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. सबब, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी तत्काळ पुणे रेल्वे पोलीस व सातारा पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला. पुणे जीआरपीला तरुणीचे छायाचित्र पाठविण्यात आले. बुधवारी रात्री १० च्या सुमारास तिला गोवा एक्सप्रेसमधून पुणे ते सातारा असा रेल्वे प्रवास करत असताना सातारा रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेण्यात आले. ती एकटी असल्याने अमरावती पोलिसांना तिची अधिक काळजी लागली होती.
काय म्हणाली तरुणी
मुलीला ताब्यात घेतल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यावेळी काही कारणांनी रागाच्या भरात मी घर सोडले, आपण एकटेच बडनेराहून बसले. पुण्याहून अमरावतीत परतायचे होते. मात्र, रेल्वे प्रवास न समजल्याने व ही रेल्वे अमरावतीला जाते असे सांगण्यात आल्यामुळे आपण साताराकडे निघाल्याची कबुली तिने दिली. राजापेठ ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक मानकर व महिला व पुरूष अंमलदाराची टिम साताऱ्याकडे रवाना झाली असून, तिचे नातेवाईक देखील पोलिसांसोबत आहे. ती शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अमरावतीत पोहोचल्यानंतर तिचे बयान नोंदविले जाणार आहे.