अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात एक-दोन नव्हे, तर १० ते १२ ‘डिसिजन मेकर’ अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. कुलगुरूंसह अन्य टॉप मोस्ट पदावर कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कारभार ढेपाळल्याचे वास्तव आहे. या गंभीर बाबीकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
गत नऊ महिन्यांपासून कुलगुरू पदावर प्रभारी म्हणून डॉ. प्रमोद येवले हे कारभार हाताळत आहेत. तसेच, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा नियंत्रक, ज्ञानस्रोत केंद्र संचालक, नवसंशोधन व नवोपक्रम साहचार्य संचालक, राष्ट्रीय सेवा योजना संचालक, मानव्य विद्या शाखा अधिष्ठाता, विज्ञान व तांत्रिकी विद्या शाखा अधिष्ठाता यासह अन्य विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांच्या शैक्षणिक, भौतिक विकास खुंटला आहे. सप्टेंबर महिन्यात ३६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. दरमहा सेवानिवृत्तांची संख्या वाढत आहे. मात्र, शासनाकडे रिक्त पदांबाबत अहवाल सादर केल्यानंतरही कर्मचारी भरतीसंदर्भात निर्णय घेण्यात येत नाही, अशी माहिती आहे.
कंत्राटी कर्मचारी भरतीचा प्रस्ताव बारगळला
गत पंचवार्षिक सिनेट सभेत मनीष गवई यांनी एका प्रस्तावाद्वारे कर्मचारी रिक्त पदांवर तोडगा म्हणून विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी भरतीचा प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर सांगोपांग चर्चा होऊन तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही ना समितीचा अहवाल, ना कंत्राटी भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. मनुष्यबळाची वानवा ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तरीही याविषयी ठोस निर्णायक भूमिका प्रशासन घेत नसल्याचे चित्र आहे.