लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लसीचे दोन्ही डोस झाले म्हणून बिनधास्त वावरत असाल तर हा गैरसमज आहे. गत आठवड्यात दोन्ही डोस घेतलेल्या सात जणांना कोविडची लागण झाल्याचे उघड झाले आहे. डेल्टा प्लस, ओमायक्रॉनचे संकट कायम असून, सायमनटेनस डोके वर काढत असल्याचा दावा तज्ज्ञांचा आहे.ओमायक्रॉनने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोविड अजूनही गेला नाही. मात्र, नागरिक सैराटपणे वागत असल्याचे दिसून येते. हीच स्थिती कायम राहिल्यास कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव होईल, असे संकेत आरोग्य विभागाने दिले आहे. गत काही दिवसांपूर्वी अमरावतीत आलेल्या विदेशी नागरिकांपैकी तिघांमध्ये डेल्टा प्लस आढळून आले आहे. या सर्व विदेशी नागरिकांनी कोरोना प्रतिबंध लसींचे दोन्ही डोस घेतले असून, त्यांच्याकडे प्रमाणपत्रदेखील आहे. या विदेशी नागरिकांमध्ये स्लाईस म्युट्रिसेशन निदर्शनास आले आहे. कोरोना नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमिवर शंभर टक्के लसीकरण करण्याचा ध्यास घेतला आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा, महापालिका, जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत. गावखेड्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे.
गर्दी टाळा, नियम पाळाकोविड अजूनही गेला नाही. दर दोन ते तीन दिवसांनी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये डेल्टा प्लसची लक्षणे असल्याने ते भविष्यासाठी धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतले असले तरी जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. गर्दी होणार नाही, याची काळजी सामूहिकपणे घेणे काळाची गरज आहे. अन्यथा ओमायक्रॉन वाढण्याची दाट भीती असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.
ओमायक्रॉन हा घातक आहे. सावधगिरी बाळगावी लागेल. दोन्ही लसीचे डोस घेतले म्हणून बिनधास्त वावरणे हे चुकीचे ठरेल. कोविड नियमावलींचे पालन केले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.- डॉ. पी. व्ही.ठाकरे, नोडल अधिकारी, फॅबलॅब अमरावती विद्यापीठ.