धनंजय मुंडेंनी घेतली दखल : शेखर भोयर यांचा पाठपुरावा अमरावती : अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्यात यावे तसेच औरंगाबाद येथील शिक्षक आंदोलनादरम्यान शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात लक्षवेधी सादर केली. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या मुंबई येथील धरमए आंदोलनादरम्यान शेखर भोयर यांनी ना. धनंजय मुंडे यांची भेट घेऊन याविषयांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यानुसार ना. मुंडे यांनी सभागृहाचे या मुद्याकडे लक्ष वेधले. राज्यात शिक्षणाच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात माध्यमिक विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी काही शाळा राज्य शासनाच्या धोरणानुसार विनाअनुदानित तत्वावर तर काही शाळा कायम विनाअनुदानित तत्वावर सुरू आहेत. विनाअनुदानित तत्वावर सुरू करण्यात आलेल्या शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने मंत्रीमंडळ बैठकीवर मोर्चा काढला होता. त्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने शासनाने शिक्षकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तातडीने मागे घेऊन १ व २ जुलै रोजी अनुदानाला पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मुंडे यांनी ही लक्ष्यवेधी सादर केली. जोवर विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर हा लढा सुरूच राहिल, असे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
कायम विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी लक्षवेधी
By admin | Published: March 21, 2017 12:17 AM