अमरावती : आयुक्तांनी कर आकारणी ही बांधकामाच्या वर्गवारीनुसारच करावी, यासाठी प्रशासकीय प्रस्ताव १७ आॅगस्ट रोजी सभागृहात पुन्हा निर्णयासाठी पाठविला होता. पंरतु या प्रस्तावाला नगरसेवकांनी फेटाळून लावले. यापूर्वी दोनपट कर आकारणीनुसार मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. मात्र, आयुक्त गुडेवार हे वर्गवारीनुसारच मालमत्ता कर आकारणी करण्याच्या बाजुने असून त्यानुसार पाचही झोनच्या सहायक आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे प्रकरण ११ मधील कलम २६७ (अ) १ (ड) अन्वये मालमत्ता कराच्या दुप्पट कर आकारणी करण्याबाबत तसेच मालमत्ता धारकास इमारत वापरात घेण्यात आलेल्या प्रथम वीज बिलाची मागणी करावी. प्रथम वीज बिल किंवा सक्षम पुरावा सादर न केल्यास इमारत वापराबाबत पुरावा शक्य नाही, अशा मालमत्तांना महापालिका अधिनियम १९४९ मधील प्रकरण ११ मधील कलम १५० (अ) नुसार मागील सहा वर्षांच्या मालमत्ता कराची आकारणी करावी, असे आदेश ७ आॅगस्ट रोजी आयुक्तांनी बजावले आहे. नवीन व अतिरिक्त बांधकाम असलेल्या मालमत्ता धारकांकडून वर्गवारीनुसार कर आकारणीची नियमावली ठरविण्यात आली आहे. आयुक्त हे वर्गवारीनुसार तर नगरसेवक दुप्पट कर आकारणीवर ठाम असल्याने हा विषय कोणते वळण घेणार हे लवकरच स्पष्ट होईल. प्रशासनाने यापूर्वी नवीन आणि विना परवानगीने बांधकामाचे सर्वेक्षण करून २४ हजार ३२१ मालमत्ताचे मोजमाप केले आहे. यात सदर बांधकाम नियमानुसार करून घेण्यासाठी १५ हजाराच्या जवळपास मालमत्ता धारकाने नोटीस देखील बजावल्या आहेत.
नोटीस बजाविणे सुरू
By admin | Published: August 21, 2015 12:39 AM