वन विभागाची कारवाई : धाबे दणाणले, सात दिवसांत मागितले स्पष्टीकरण अमरावती : नियमबाह्य लाकूड कापल्याप्रकरणी तीन आरागिरण्यांचे परवाने निलंबनासाठी शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली. सात दिवसांत या नोटीसला उत्तर न आल्यास आरागिरण्यांचे परवाने निलंबित करण्यात येईल, असे कारणे दाखवा नोटीशीत नमूद आहे.वलगाव मार्गावरील नेहा वूड, रेवसा येथील वाह ताज तर स्थानिक हमालपुरा नेहरु टिंबर मार्केटमधील गुरुकृपा सॉ मिल यांच्या नावे संबंधित मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गत काही दिवसांपापूर्वी वनविभागाने नेहा वूड, वाह ताज या आरागिरण्यांवर धाडसत्र राबवून अवैध लाकू ड जप्त केले होते. या दोन्ही आरागिरणीत आडजात लाकूड असल्याचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे आरागिरणीत असलेले लाकूड कोणत्या प्रजातीचे आहे, हे तपासण्यासाठी जप्त लाकडाचे १३ नमुने देहरादून येथे प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले. या लाकडांच्या नमुन्यांचे अहवाल अप्राप्त असल्यामुळे ठोस कारवाई करता येत नाही. त्यामुळे वनविभागाने धाडसत्रात मिळालेल्या लाकडाचा अवैध साठ्याप्रकरणी महाराष्ट्र वन नियमावली २०१४ कलम ५३ (८) नुसार आरागिरणी मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. नोटीशीनंतर सात दिवसांत आरागिरणी मालकांना स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. वनविभागाने आडजात लाकू ड कापणे, वाहतुकीला मनाई केली असताना शहरात मोठ्या प्रमाणात आडजात लाकूड आणले जात आहे. वलगाव मार्गालगतच्या आरागिरण्यांत नियमबाह्य लाकडाचे वाहने आणले जात आहेत. शहरात आरागिरण्यांमध्ये आणल्या जाणाऱ्या अवैध लाकडांना वनपाल जबाबदार आहेत. नेहा वूड आरागिरणीत अतिरिक्त लाकूडसाठा असताना वनपालांनी घटनास्थळी कमी लाकूड दाखविले. नेहा वूड आरगिरणी संचालकांना पाठीशी घालण्याचे कारण काय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. (प्रतिनिधी)
तीन आरागिरण्यांना परवाना निलंबनासाठी नोटीस
By admin | Published: April 23, 2016 12:15 AM