अमरावती : विभागातील तीन जिल्ह्यात १६ तालुक्यातील १०६ महसूल मंडळात पिकांचे सरासरी उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. या मंडळांसाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी केली. ही अधिसूचना पीक विमा कंपनीला बंधनकारक आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना भरपाईचा २५ टक्के महिनाभरात मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार अकोला जिल्ह्यात सात तालुक्यातील ५२ महसूल मंडळ, बुलढाणा जिल्ह्यात तीन तालुक्यांत आठ मंडळ तर वाशिम जिल्ह्यात सहा तालुक्यात ४६ मंडळांतील पिकांसाठी ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे.
पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड (मिड सिझल ॲडव्हर्सिटी) ही आपत्ती गृहीत धरण्यात येते. प्रतिकूल परिस्थितीत संबंधित मंडळातील पिकांची नजरअंदाज पाहणी तालुकास्तरीय समितीद्वारा करण्यात येते व समितीच्या अहवालावर जिल्हा समितीच्या बैठकीत चर्चा होऊन शिक्कामोर्तब झाल्यानंतर बाधित महसूल मंडळांसाठी जिल्हाधिकारी अधिसूचना काढतात.