अमरावती : पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा लावला असून, गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी एमपीडीएच्या आयुधाचा प्रभावी वापर चालविला आहे. ८ नोव्हेेंबर रोजी पुन्हा एका कुख्यात गावठी हातभट्टीचालकाविरूध्द एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात आली. त्याला शुक्रवारीच एक वर्षांसाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. संतोष मोहन बेनिवाल (४६, रा. परीहारपुरा, वडाळी) असे एमपीडीए करण्यात आलेल्या हातभट्टीची दारू गाळणाऱ्या आरोपीचे नाव आहे. यंदाच्या वर्षातील ११ गुन्हेगारांवर एमपीडीए करण्यात आला आहे.
कुख्यात गुन्हेगार संतोष बेनिवाल हा सन २०२१ पासुन गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचेविरूध्द फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गावठी हातभट्टी गाळून शरीरास घातक असलेली ती दारू विक्री करणे, असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असतानादेखील तो गावठी हातभट्टी दारू गाळून त्याची विक्री करतो. त्याच्या अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब उध्दवस्त होत आहेत. तर, सोबतच त्याच्या दारूच्या अड्यामुळे परिसरातील शाळकरी मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निरिक्षण पोलिसांनी नोंदविले. त्याच्या अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीवर बराच प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र कायदयास न जुमानता त्याने दारूचे गुत्ते सुरू ठेवले होते. त्यामुळे त्याच्याविरूध्द एमपीडीएची प्रभावी कार्यवाही करून त्यास कारागृहात बंदिस्त करण्यात आले. परिसरातील नागरिकांकडून या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त होत आहे.
यांनी केली कारवाईफ्रेजरपुराचे ठाणेदार निलेश करे यांनी पाठविलेल्या प्रस्तावाची गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे व पोलीस निरिक्षक सिमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए सेलमधील सहायक पोलिस निरिक्षक इम्रान नायकवडे, पोलीस अंमलदार विनय गुप्ता, अजय मिश्रा, चेतन कराडे तसेच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथील सहायक पोलिस निरिक्षक रविंद्र सहारे, अंमलदार विनोद इंगळे यांनी पुर्तता केली. त्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी ८ नोव्हेंबर रोजीआदेश पारीत केले. ते आदेश तामिल करून त्याला स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.