लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशन मोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल व आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिली.मंगळवारी सकाळी बेलोरा विमानतळाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व विमानतळाची पाहणी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (एमएडीसी) मुख्य अभियंता एस.के. चटर्जी, रामेश्वर कुरजेकर, त्याचप्रमाणे राईटस् लिमिटेड या कंपनीचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आवश्यक निधीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल. स्वतंत्र बैठक होईल. आवश्यक तो सर्व निधी मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. एटीआर-७२ विमाने उतरण्याची सुविधा व नाईट लॅडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी ‘एमएडीसी’कडून राईटस् लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. राईटस् लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे.
अद्ययावतीकरण होणारविमानतळावर एटीआर-७२ किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येत आहे. येथे रात्रीच्यावेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. या विमानतळाचा उडान (आरसीएस) या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
पाणी, वीज, वळण रस्ते पूर्णमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विमानतळाला पाणीपुरवठा, महावितरणमार्फत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या संरक्षणभिंतीची उभारणी प्रगतिपथावर आहे. नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येत असून, त्याची निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. धावपट्टीची लांबी १३७२ वरून १८५० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.